– हॉटेल व्यावसायिकांवर ‘चुली’ची वेळ
कामठी :- इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता थेट कामठीच्या गल्लीबोळात उमटताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण होईल, या भीतीने कामठीतील नागरिक धास्तावले असून, गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी पहाटे साडेपाच वाजल्यापासून गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दैनंदिन कामावर पाणी फेरून नागरिक रांगेत
गेल्या काही दिवसांपासून कामठीतील तिवारी गॅस एजन्सी आणि इतर कार्यालयांबाहेर अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. विशेष म्हणजे, केवळ पुरुषच नव्हे तर घरातील गृहिणीही पहाटे आपलं घरकाम आणि हातावरचे पोट असलेले नागरिक आपला रोजचा धंदा सोडून सिलिंडरसाठी रांगेत उभे आहेत. “उद्या गॅस मिळेल की नाही?” या चिंतेने सर्वसामान्यांची मोठी धावपळ उडाली आहे.
‘काळाबाजार रोखण्यासाठी OTP अनिवार्य’ –
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सी द्वारे नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅसचा कोणताही तुटवडा नाही.
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासकीय नियमांनुसार बुकिंग प्रक्रिया कडक केली आहे.
ज्या ग्राहकांनी गॅस बुक केला आहे आणि ज्यांच्या मोबाईलवर OTP (वन टाइम पासवर्ड) येईल, त्यांनाच सिलिंडरचे वितरण केले जात आहे.
पारदर्शकता राखण्यासाठी कार्यालयातून रीतसर OTP घेणाऱ्यांना हमखास गॅस उपलब्ध करून दिला जात आहे.
– बबलू तिवारी, संचालक तिवारी गॅस एजन्सी कामठी
हॉटेल व्यावसायिक संकटात; पुन्हा चुलीचा आधार
या परिस्थितीचा मोठा फटका स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अनेक हॉटेल मालकांनी आता पुन्हा जुन्या पद्धतीच्या चुली पेटवण्यास सुरुवात केली आहे. “जर अशीच परिस्थिती राहिली, तर गॅसवर चालणारे आमचे व्यवसाय बंद पडतील आणि आम्हाला पूर्णपणे चुलीवरच स्वयंपाक करावा लागेल,” अशी हताश भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
युद्धामुळे गॅस पुरवठा कायमचा बंद होईल, अशा अफवा शहरात पसरत असल्याने ही गर्दी वाढत आहे. मात्र, एजन्सी मालकांनी साठा पुरेसा असल्याचे सांगितले असून केवळ वितरण प्रक्रियेतील बदलामुळे हा वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले आहे. आता प्रशासनाकडून या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




