spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

यवतमाळ :- महाराष्ट्रातील जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून सहसचिव वर्षा भरोसे यांनी याबाबतचे अधिकृत पत्रक जारी केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील सुधारित तरतुदी तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपते त्या महिन्याच्या सहा महिने आधीपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित क्षेत्र व हद्दीत कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमानुसार तहसिलदारांनी 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत गुगल अर्थ नकाशांवर सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचे अंतिम नकाशे तयार करणे. त्यानंतर संबंधित तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे. तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने, ज्यामध्ये गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल, 5 मार्च 2026 पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे.

समितीने तयार केलेला प्रारूप प्रस्ताव 11 मार्च 2026 पर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे. जिल्हाधिकाऱ्यांनी नमुना ‘ब’ मधील प्रारूपाची संक्षिप्त तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या करत तो 17 मार्च 2026 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवणे. राज्य निवडणूक आयोगाने किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याने 23 मार्च 2026 पर्यंत आवश्यक असल्यास दुरुस्त्या करून अंतिम मान्यता देणे. त्यानंतर 30 मार्च 2026 पर्यंत तहसिलदार अध्यक्षतेखालील समितीने सर्व दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणे.

प्रारूप प्रभाग रचनेला 7 एप्रिल 2026 पर्यंत व्यापक प्रसिद्धी देऊन हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहिर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना 13 एप्रिल 2026 पर्यंत हरकती सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या सर्व हरकती 16 एप्रिल 2026 पर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील व 21 एप्रिल 2026 पर्यंत त्यावर सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतर प्रत्येक हरकतीवर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव 23 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल.

उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त प्रस्तावांची तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी 28 एप्रिल 2026 पर्यंत प्रभाग रचना अंतिम करुन ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावी. आयोगाच्या मान्यतेनंतर 4 मे 2026 पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.