– अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींचा समावेश
यासीन शेख, गोंदिया अर्जुनी मोरगाव :- माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज ता.१७ रोजी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला. याबाबतचे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुदत संपत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याची तयारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १० मधील पोट कलम खंड (ब) नुसार मिळालेल्या इतर अधिकारांचा वापर करून ग्रामपंचायतीची प्रभाग रचना करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आला असल्याने त्यानुसार मुदत संपलेल्या व दरम्यानच्या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग सध्या तरी मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचनेला २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार असून गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोस करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे,संबंधित क्षेत्रातील तलाठी ग्रामसेवक यांनी संयुक्तस्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे सीमा निश्चित करणे,प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेला प्रस्ताव तपासून जिल्हाधिकऱ्याकडून प्रभाग रचना अंतिम करून निवडणूक आयोगाला २८ मार्च २०२६ रोजी देण्यात येऊन राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेला ४ एप्रिल रोजी व्यापक प्रसिद्धी दिली जाईल.
“ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी बोंडगाव देवी बोंडगाव सुरबन बोरी बोरटोला देवलगाव दिनकरनगर ईसापुर जाणवा कन्हाळगाव करांडली कवठा केशोरी कोरंभिटोला कुंभिटोला महागाव माहूरकुडा मांडोखाल परसटोला परसोडी रैय्यत पवनीधाबे प्रतापगड सावरटोला सिलेझरी तिडका येगाव झांसीनगर अशा २८ ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.”




