– मार्गावर मोठ्या भेगांनी वाहनचालक धास्तावले; रात्री अंधारात अपघातांचे वाढते सत्र
– अनेकदा घडले अपघात, अनेकांना गंभीर दुखापत
– प्रशासन मोठ्या अपघाताच्या प्रतीक्षेत?
संदीप कांबळे,कामठी :- कामठी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र 247 दहेगाव उमरेड मार्गाला जोडणाऱ्या कामठी-वारेगाव बायपास मार्गाचे बांधकाम 1656.56 लक्ष रुपयाच्या निधीतून 2020 मध्ये अभि इंटरप्रयझेस च्या कंत्राटदाराच्या माध्यमातून बांधण्यात आले मात्र या बांधकामात कुठलाही राम नसून निषकृष्ट पद्ध्तीचे बांधकाम असल्यामुळे या रस्त्याचे दोन वर्षातच पितळ उघडे झाले व रस्ता बांधकामाचे मुख्य राज उघडले .या रस्त्यावर मोठमोठ्या पडलेल्या भेगा ह्या वाहनधारकासाठी अपघाती मृत्यूचे निमंत्रक ठरत आहे. . या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. याच मार्गावरून दररोज अनेक दुचाकीस्वार आपल्या कुटुंबासह ये-जा करतात. अशा वेळी एक छोटीशी चूक किंवा अचानक दुचाकी स्लिप झाली, तर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या बायपास मार्गाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, दिवसा वाहन चालवताना देखील वाहनचालकांना सतर्क रहावे लागते. परंतु रात्रीच्या वेळी तर हा मार्ग अधिकच धोकादायक ठरतो. कारण या संपूर्ण रस्त्यावर विद्युत दिव्यांची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे पूर्ण अंधारात वाहन चालवणे हे दिव्यातून वाट काढण्यासारखे झाले आहे. यामुळे दुचाकी वाहनांचे स्लिप होणे, खड्ड्यांमध्ये अडकणे व अपघात होणे हे रोजचेच झाले आहे.
या बायपास मार्गाचे उद्घाटन अवघ्या चार वर्षांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात झाले होते. पण केवळ एका वर्षातच रस्त्यावर भेगा पडण्यास सुरुवात झाली. स्थानिक प्रशासनाने यावर तात्पुरते डागडुजीचे उपाय केले असले तरी ते अल्पकालीन ठरले. भेगा पुन्हा तशाच स्वरूपात उद्भवत असल्यामुळे या मार्गाची गंभीर दुरवस्था झाली आहे.
या मार्गावर याआधीही अनेक अपघात घडले असून काही घटनांमध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वारंवार संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले असले तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.
प्रशासनाने या मार्गाची तातडीने पाहणी करून संपूर्ण दुरुस्ती करावी, विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, तसेच रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबणार नाही, अशी चिंता सर्वत्र व्यक्त होत आहे.




