नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन अंतर्गत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय जनगणना-२०२७ कामासाठी प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप कार्यभार स्वीकारलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचारी/ अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जनगणना-२०२७ हे अत्यंत महत्त्वाचे शासकीय काम असून संबंधितांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, नियुक्ती होऊनही काही अधिकारी व कर्मचारी कार्यात रुजू झाले नसल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. धरमपेठ झोन कार्यालयाकडून अशा गैरहजर प्रगणक व पर्यवेक्षकांविरुद्ध शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार, संबंधित शाळा, महाविद्यालये, निमशासकीय व विनाअनुदानित संस्था तसेच शासकीय व केंद्र शासकीय कार्यालयांच्या विभागप्रमुखांना तातडीने आदेशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित आपल्या नियुक्त ठिकाणी रुजू व्हावे, अन्यथा शासकीय नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. महानगरपालिकेने सर्व संबंधितांनी सहकार्य करून जनगणना कार्य सुरळीतपणे पार पाडावे, असे आवाहन धरमपेठ झोन चे सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम यांनी केले आहे.








