नाशिक :- दिवाळीच्या सुट्टीनंतर खुले झालेल्या कांद्याच्या घाऊक बाजारात नवीन लाल पोळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ४,७०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला ३,८०० रुपये दर मिळाले. लाल कांद्याची सध्या तुरळक आवक होत आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. लाल कांद्याची आवक वाढण्यास महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असून, तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
दीपावलीनिमित्त जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज आठ ते दहा दिवस बंद होते. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी नवीन लाल कांद्याची १,००२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल कमाल ५,४२१, किमान २,००१, तर सरासरी ४,७०० रुपये भाव मिळाला. उन्हाळ कांद्याची १,११६ क्विंटल आवक होऊन त्यास कमाल ४,३५३, किमान २,००१, तर सरासरी ३,८०० रुपये दर मिळाले.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतही दिवाळीनंतर लाल पोळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. या बाजार समितीत नवीन कांद्याला सरासरी ४,४००, तर उन्हाळ कांद्याला ४,००० रुपये दर मिळाला. पावसाअभावी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पिकांचे नुकसान झाले. कांद्यालाही काही प्रमाणात झळ बसली. जुना उन्हाळ कांदा संपुष्टात येत असताना नवीन लाल कांदा बाजाराची मागणी पूर्ण करतो. नवीन कांदा मुबलक प्रमाणात बाजारात येण्यास अजून महिनाभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कांद्याचे दर असेच राहण्याचा अंदाज लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी व्यक्त केला.
किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये किलो
घाऊक बाजारात जुन्या व नव्या कांद्याचे प्रतिकिलो दर ३८ ते ४८ रुपये आहेत. किरकोळ बाजारात येताना वाहतूक, व्यापाऱ्यांचा नफा व अन्य खर्च समाविष्ट होऊन हाच कांदा ७० ते ८० रुपयांच्या घरात पोहोचतो. देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या नाशिकमध्ये कांद्याचे हे दर आहेत. महानगरांमध्ये कांद्याने शंभरी गाठली आहे. यामुळे गृहिणींच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम झाला आहे. वाढत्या दरामुळे ग्राहक खरेदीसाठी हात आखडता घेत असल्याचे विक्रेते सांगतात. एरवी पाच किलो कांदा खरेदी करणारे ग्राहक सध्या केवळ एक ते दोन किलो कांदा खरेदी करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नवीन लाल कांद्याची आवक वाढल्यानंतर हे दर काही अंशी आटोक्यात येतील. त्याची ग्राहकांना प्रतीक्षा आहे.
उन्हाळ कांद्याचीच निर्यात
कांद्याचे दर साडेतीन ते साडेचार हजार रुपयांवर असल्याने निर्यात काही प्रमाणात होत आहे. नवीन लाल कांदा ओलसर असतो. त्याचे आयुर्मान कमी असते. त्यामुळे जी काही निर्यात होते, ती मुख्यत्वे जुन्या उन्हाळ कांद्याचीच होत असल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.






