– शांतता समिती बैठकीदरम्यान गौरक्षकांचे निवेदन; बकरी ईद पार्श्वभूमीवर गोवंश कुर्बानी रोखण्याची मागणी
कामठी :- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीदरम्यान अचानक मोठ्या संख्येने गौरक्षक युवक पोलीस स्टेशन परिसरात दाखल झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत संबंधितांचे निवेदन स्वीकारून परिस्थिती नियंत्रणात आणली.
बुधवारी सायंकाळी नवीन व जुने कामठी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने नवीन कामठी पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस वसाहतीजवळ शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बकरी ईद सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून विविध सूचना व मार्गदर्शक सूचना बैठकीत देण्यात आल्या.
बैठक अंतिम टप्प्यात असतानाच सुमारे ५० ते ६० गौरक्षक युवक अचानक पोलीस स्टेशन आवारात दाखल झाले. त्यामुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलीस प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने बैठक आटोपती घेतली व संबंधित युवकांशी चर्चा सुरू केली.
गौरक्षकांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात बकरी ईदच्या काळात कोणत्याही परिस्थितीत गोवंशाची कुर्बानी होऊ नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच अशा घटनांमुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका मांडण्यात आली.
यावेळी नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश अंधारे, जुने कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे तसेच सहायक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांनी गौरक्षक युवकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढली व निवेदन स्वीकारले.दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कामठी शहरात शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.