Home Latest News ‘देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातींसाठी ५० कोटींचा खर्च करणारा दानशूर कोण?’ – संजय राऊत...

‘देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातींसाठी ५० कोटींचा खर्च करणारा दानशूर कोण?’ – संजय राऊत यांचा सवाल

0
62

मुंबई ८ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींवरून निशाणा साधला आहे. या जाहिरातींसाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला असून, हा खर्च कोण करत आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

राऊत म्हणाले, “या जाहिराती गुंड प्रवृत्तीचे लोक देतात. मुख्यमंत्र्यांची एक आचारसंहिता असते, जी पाळली पाहिजे. पण अलीकडच्या काळात ही प्रथा बंद झाली आहे. अशा जाहिराती बिल्डर किंवा दोन नंबरी लोक देतात. ‘देवाभाऊ’साठी एवढा खर्च करणारा हा ‘दानशूर कर्ण’ कोण आहे? त्याला काय फायदा झाला आहे, हे लोकांना कळले पाहिजे.”

उपराष्ट्रपती आणि मुंबई मनपा निवडणुकीवरही भाष्य

संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीबद्दलही आपली भूमिका मांडली. त्यांनी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “देश आणि संविधान वाचवण्यासाठी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डी योग्य उमेदवार आहेत.”

त्याचबरोबर, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले, “आमचे काही नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले, तरी आगामी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुका शिवसेना (ठाकरे गट)च जिंकेल, याचा मला विश्वास आहे.”

अजित पवार यांच्यावर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोलताना राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून टीका केली. सरकारी कामात हस्तक्षेप केल्याबद्दल कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. यावर राऊत यांनी, “ज्यांनी सरकारमध्ये बसून हस्तक्षेप केला ते उपमुख्यमंत्री आहेत. स्वतःला नीतिमान राजकारणी म्हणवणारे अजित पवार यावर उत्तर देतील का?” असा सवाल विचारला. त्यांनी पुढे म्हटले की, “एखाद्या महिला अधिकाऱ्याला दिलेले काम सार्वजनिक होते का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. विरोधी पक्षाने असे केले असते तर भाजपने आंदोलन केले असते. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी यावर बोलले पाहिजे.”