spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रविवारच्या सकाळला कोणाचे भवितव्य उजेडदार आणि कोण ठरेल नशिबाचा बादशहा, ५ फेऱ्यांत; ५ टेबलवर होणार मोजणी

खापा :- माननीय न्यायालयाच्या न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने निवडणूक आयोगाने निवडणुकी लावल्या आणि २ डिसेंबरला संपूर्ण राज्यात नगरपंचायत, नगरपालिकेची निवडणूक पार पडली. निवडणूक आयोगाच्या पूर्व नियोजनाने तीन डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचे रिझल्ट अपेक्षित होते.

यादरम्यान निवडणूक आयोगाने आरक्षणाच्या वादात अडकलेल्या काही नगरपंचायत नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलल्याने यांच्यासोबत २ डिसेंबरला झालेल्या निवडणुकांचे रिझल्ट २१ तारखेला संपूर्ण मतमोजणी होईल असे दिशानिर्देश दिले. यावेळी सर्व उत्साही उमेदवार निरुत्साही झाले. यादरम्यान उमेदवारांची चांगलीच पायपीट झाली. सर्वपक्षीय उमेदवार कधी टोळी बनवून तर, कधी एकटे पणाने कडाक्याच्या थंडीत जागली करून शेकोटीच्या सहाय्याने स्ट्रॉंग रूमची राखण करीत राहिले. आणि सर्व उमेदवार खापा शहराच्या विकासासाठी सज्ज आहोत असे दर्शवून दिले.

झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ५८ उमेदवार असे एकूण ६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यादरम्यान भाजप आणि काँग्रेस असे दोन राष्ट्रीय पक्ष तर शिवसेना (शिंदे गट) असा राज्यस्तरीय पक्षात तिरंगी लढत दिसून आली. तर अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून त्यांचे नशीब किती साथ देते याकडे ही नगरवासियांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान येणाऱ्या रविवारच्या सूर्योदयाने कोणाचे नशीब उजाडणार हे अद्याप कडाक्याच्या थंडीत गोठलेले आहे.

अखेर आता मतमोजणीची वेळ जवळ आली असून येत्या २१ डिसेंबर रविवारला नगर परिषद खापा सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवारी (दि. २१) सकाळी १० वाजतापासून करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मतमोजणी पोलिस स्टेशन जवळील सामुदायिक भवन नविन वस्ती खापा येथे होणार आहे. मतमोजणीसाठी १ टपाल टेबल तर ४ इ. वी. एम. टेबल एकूण ५ टेबल ठेवण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया ५ फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे. मतमोजणी कामकाजासाठी सुमारे ४० अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी शांतता व शिस्त पाळावी, असे आवाहन निवडणूक प्रशासन व खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर भुजाडे यांनी केले आहे. पोलीस प्रशासनाने अतिरिक्त कडक कटेकोर बंदोबस्त ठेवला आहे.

Popular Articles