– मुख्य रस्त्यावर अचानक कळपाचा शिरकाव; दुचाकीस्वार व पादचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध :- ग्रामपंचायत परिसरात रानडुकरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी (ता. २८) सकाळी सुमारे दहाच्या सुमारास रानडुकरांचा कळप अचानक मुख्य रस्त्यावर आल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. रानडुकरांनी रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या दिशेने धाव घेत हल्ल्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
रानडुकरांचा कळप अचानक मुख्य रस्त्यावर शिरल्याने काही काळ वाहतुकीतही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर रानडुकरांनी ग्रामपंचायतीलगतच्या मोहल्ल्याकडे धाव घेत तेथेही प्रवेश केला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली.
नवेगावबांध परिसरात रानडुकरांचा मानवी वस्तीत वारंवार वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः सकाळच्या वेळी मुख्य रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत रानडुकरांनी अचानक हल्ला केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
रानडुकरांचा वावर केवळ शेतशिवारापुरता मर्यादित न राहता आता थेट मानवी वस्तीत वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने वनविभागाच्या सहकार्याने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
“आज थोडक्यात अनर्थ टळला. मात्र भविष्यात एखाद्या नागरिकावर रानडुकराचा हल्ला होऊन जीवितहानी होण्यापूर्वी ग्रामपंचायत व वनविभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे,” अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य हरीभाऊ मेघ्राम यांनी केली.
रानडुकरांचा वाढता वावर लक्षात घेता स्थानिक वनविभागाच्या सहकार्याने त्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“रानडुकरांचा वावर आता केवळ शेतशिवारापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर थेट मानवी वस्तीत वाढला आहे. सकाळच्या वेळी रस्त्यावर नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दुचाकीस्वारांची मोठी वर्दळ असते. अशावेळी अचानक रानडुकरांचा कळप समोर आल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. आज सुदैवाने अनर्थ टळला; मात्र प्रशासनाने एखादी गंभीर घटना घडण्याची वाट न पाहता वनविभागाच्या मदतीने तातडीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी रानडुकरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.”
— संतप्त नागरिक, नवेगावबांध





