spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कॉलेजपेक्षा क्लास ठरवणार का? ही कसली शिक्षण पद्धत? : राज ठाकरे

मुंबई :- आता नीटचा पेपर याच कोचिंग क्लासवाल्यांकडूनच फुटला ना? आत्तापर्यंत जेवढे पेपर फुटले, ते सर्व या कोचिंग क्लासवाल्यांकडूनच फुटले ना? नंदन नीलेकणी यांनी या क्लासेसवर पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. क्लासेस ठरवणार की विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत?” असा थेट सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरण, विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि सरकारच्या उदासीनतेवर अत्यंत आक्रमक शब्दांत भाष्य केले.

शिक्षण पद्धतीत झालेल्या भीषण बदलांवर बोट ठेवताना राज ठाकरे म्हणाले, “आज राज्यातील शिक्षण परिस्थिती अत्यंत बिकट आणि बिकार झाली आहे. दहावी पास झाल्यावर विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायची आणि मग तो क्लास ठरवणार की विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा! आज विद्यार्थी कॉलेजला न जाता आठ-आठ तास कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन बसत आहेत. मग महाविद्यालये काय करत आहेत? कॉलेजची फी 20 हजार आणि क्लासची फी 1 लाख 40 हजार रुपये! हे क्लासेस आणि कॉलेजच्या संगनमतानेच चालले आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. आठ-आठ तास क्लासमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉलेजमधील उपस्थिती (अटेंडन्स) कशी लागते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘नाशिकच्या यश गोसावी’चा उल्लेख

विद्यार्थ्यांच्या नैराश्यावर आणि आत्महत्येवर बोलताना राज ठाकरे आक्रमक झाले. “माझ्याकडे काल काही विद्यार्थी आले होते, त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि निराशा होती. ‘साहेब, परत नीटचा पेपर नाही ना फुटणार?’ असा प्रश्न जेव्हा विद्यार्थी विचारतात, तेव्हा खूप वाईट वाटतं. नाशिकमधील यश गोसावी या विद्यार्थ्याने नीटचा पेपर फुटल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. काल त्याचे नातेवाईक मला भेटले. आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांची यादी प्रशासनाकडून येते, पण त्या यादीत या नाशिकच्या यश गोसावीचे 22 वे नाव जोडायला या सरकारला आणि प्रशासनाला वेळ नाही,” अशा शब्दांत त्यांनी सरकारची कानउघाडणी केली.

जंतर-मंतरवरील आंदोलन ही केवळ सुरुवात

तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या असंतोषाचा इशारा देताना राज ठाकरे म्हणाले, “जंतर-मंतरवर झालेले आंदोलन ही केवळ सुरुवात आहे. आंदोलनात आलेले सगळेच काही नीटचे विद्यार्थी नव्हते, पण जो तरुण तिथे आला होता, त्याच्या मनात सरकार आणि या कुजलेल्या व्यवस्थेविरुद्ध प्रचंड राग आहे. जेव्हा पोलीस किंवा प्रशासन या तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतं, तेव्हा घरातील प्रत्येक आई-बाप, आजोबा-आजीला वाटतं की हे आमच्या पोराला मारत आहेत. सरकारने या असंतोषाची वेळीच दखल घेतली नाही आणि या बेकायदेशीर कोचिंग क्लासेसवर लगाम घातला नाही, तर हा राग अधिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडेल.”

Popular Articles