नागपूर :- टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या वतीने व नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक महिला दिनानिमित्त, ८ मार्च रोजी प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात दरवर्षी स्त्री गौरव हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात आपले आयुष्य घालविलेल्या एका ज्येष्ठ समाजसेविकाला देण्यात येतो. तसेच पत्रकार पत्नींनाही गौरवान्वित करण्यात येत असते. याव्यतिरिक्त वूमन जर्नलिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार, ज्येष्ठ संपादक एस.एन. विनोद यांच्या दिवंगत पत्नी शोभा विनोद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जात असतो. येत्या ८ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात येत आहे. यंदा या पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत. स्त्री गौरव पुरस्कार- छाया खोब्रागडे, शोभा विनोद स्मृती पुरस्कार- अंकिता देशकर (द इंडियन एक्सप्रेस), महिला पत्रकारांमध्ये, भाग्यश्री शर्मा (लोकमत समाचार), अश्विनी मारोळकर-पाचखेडे (सकाळ), भाग्यश्री राऊत (बीबीसी) व देवश्री भिमटे (युसीएन) आणि पत्रकारपत्नी या श्रेणीत पल्लवी केवल जीवनतारे यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रेसक्लब व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे सरचिटणीस व नागपूर प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष शिरीष बोरकर, नागपूर श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व नागपूर प्रेस क्लबचे सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे जोसेफ राव व वर्षा बाशू यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.








