spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा लोकभवन येथे सत्कार

मुंबई :- अंध महिलांच्या टी २० विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकभवन येथे सत्कार करण्यात आला.

भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसेच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले ! इंडिया’ या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त लोकभवन येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर रितु तावडे, एसएनडीटी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू, संघाचे अध्यक्ष डॉ. महांतेश जी. के., प्रशिक्षिका शिखा शेट्टी तसेच दिव्यांगांच्या शाळा व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी आपण ‘देख ले !इंडिया’ या महिला क्रिकेट संघाच्या प्रवासाच्या माहितीपटाचा ट्रेलर पाहिला. हा माहितीपट केवळ एखाद्या क्रिकेट संघाच्या विजयाची गाथा नसून तो दिव्यांग महिला खेळाडूंसमोरील सामाजिक – आर्थिक आव्हाने, त्यांच्यामध्ये दिसून येत असलेली कुटुंबाच्या जबाबदारीची भावना, समानतेसाठी त्यांचा लढा व परिश्रमपूर्वक मिळवलेल्या विजयाचे सजीव चित्रण आहे. त्यामुळे आपण माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित केले असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. अंध महिला क्रिकेटपटूंनी केवळ विश्व चषक जिंकला नाही तर देशातील करोडो भारतीयांचे हृदय जिंकले असल्याचे त्यांनी सांगितले.

‘देख ले! इंडिया’ हा माहितीपट अधिकाधिक शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये दाखविण्याबाबत आपण संबंधितांना सूचना देऊ असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. विद्यापीठांनी दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी आपल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. शासकीय संस्था, सार्वजनिक उपक्रम, कॉर्पोरेट व खासगी क्षेत्राने देखील दिव्यांग खेळाडूंना रोजगाराची संधी द्यावी, असे आवाहन देखील राज्यपालांनी केले.

आज माध्यमांच्या सुकाळात माहिती भरपूर मिळते, परंतु प्रेरणा देणाऱ्या कलाकृती मोजक्याच असतात. ‘देख ले ! इंडिया’ हा माहितीपट अतिशय प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात क्रिकेटपटूंना मान सन्मान मिळतो, त्यांच्या खेळांना स्पॉन्सरशिप मिळते. परंतु दिव्यांग खेळाडूंकडे प्रतिभा असून देखील पुरेशी मान्यता मिळत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अंध महिला खेळाडूंना गरिबी, घरातून होणारा विरोध, शारीरिक आव्हाने यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांची क्रिकेटमधील वाटचाल विशेष गौरवास्पद ठरते, असे राज्यपालांनी सांगितले.

अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत करून विश्वचषक जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खेळाडूंचे कौतुक केले. हा विजय आत्मविश्वासाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग खेळाडूंना सहानुभूती नको तर संधी हवी, असे सांगून अंध महिला क्रिकेटपटूंना संधी मिळाल्यावर त्यांनी तिचे सोने केले असे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी ‘देख ले इंडिया’ माहितीपटाच्या निर्मात्या शांती मोहन व दिग्दर्शक मुकुंद मूर्ती यांचे अभिनंदन केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी खेल रत्न, अर्जुन पुरस्कार विजेत्या दिव्यांग खेळाडू डॉ. दीपा मलिक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अंध महिला संघाच्या सदस्य सिमू दास, प्रिया खीर, अनु कुमारी, जमुना राणी टुडू , काव्या, अनेखा देवी, बसंती हंसदा, सिमरणजित कौर, सुनीता सराटे, पर्बती मरांडी, कर्णधार दीपिका टी. सी., फुला सोरेन, उपकर्णधार गंगा कदम, काव्या एन आर, सुषमा पटेल, दुर्गा येवले, क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडियाचे अध्यक्ष डॉ महांतेश जी के व चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांचा सत्कार करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.