हंसराज भंडारा :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील सर्व 33 प्राथमिक आरोग्य केंद्र व 193 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अश्या आरोग्य संस्थांमार्फत विविध पर्यावरण संवर्धन व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती, पर्यावरण संरक्षण विषयक मार्गदर्शन तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आले.
या दिनाचा इतिहास
जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्टॉकहोम परिसंवाद आणि पर्यावरण परिषदेच्या मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या जागरूकतेवर झालेल्या चर्चेनंतर झाली. दोन वर्षानंतर, 1974 मध्ये “फक्त एक पृथ्वी” या थीमसह पहिला जागतिक पर्यावरण दिन आयोजित करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. परिसर स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ व हरित वातावरणाचा संदेश देण्यात आला. तसेच प्लास्टिकच्या वापरात कपात, जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत जनजागृती करण्यात आले.
हा दिवस पर्यावरण संवर्धनाबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी लोकांना सक्रिय कृती करण्यास प्रेरित करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीची आठवण करून देतो. पर्यावरण हा मानवाच्या आरोग्याशी थेट संबंधित घटक असून स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, जैवविविधता आणि हरित परिसर हे निरोगी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. वाढते प्रदूषण, आणि प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारणे काळाची गरज आहे
पर्यावरण आणि आरोग्य महत्व-
पर्यावरणीय प्रदूषणामुळे श्वसनाच्या समस्या, हृदयरोग, कर्करोग, जलजन्य रोग यांसारख्या अनेक आरोग्य समस्या वाढतात. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, हिरवे हामान, संतुलित नैसर्गिक पर्यावरण हेच चांगल्या आरोग्याचे मूलभूत घटक आहेत. त्यामुळे, पर्यावरणाचे संवर्धन करणे म्हणजेच आपल्या आणि आपल्या आगामी पिढ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे होय.
भंडारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचला असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी उपस्थितांना पर्यावरणाचे संरक्षण हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनविण्याचे आवाहन डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संदीप गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सचिन चव्हाण, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी व NPCCHH काऱ्याकर्माचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. श्रीकांत आंबेकर यांच्या मार्फत करण्यात आले.








