spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक तंबाखू विरोधी दिन : तंबाखूविरोधी लोकचळवळीची गरज

३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने प्रस्तावित केलेले घोषवाक्य हे “आकर्षणाचा मुखवटा फाडणे- निकोटीन आणि तंबाखूचे व्यसन रोखणे” असे आहे.

आज समाजाचा विचार केला तर असे लक्षात येत आहे की समाजाच्या अगदी खालच्या स्तरांपासून ते उच्च स्तरापर्यंत सर्वामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन हे पाहायला मिळत आहे. घर, कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदांर्थाचे व धूम्रपान करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सर्वसाधारणपणे लोकांमध्ये तंबाखूविषयीची समज भिन्न प्रकारची दिसून आली आहे. समाजात तंबाखू विषयी फक्त अशी एक धारणा आहे की तंबाखू हा शरीरासाठी उत्तेजनाजनक आहे. तंबाखूमुळे शरीराला उत्तेजना मिळते पण समाजातला हा समज साफ चुकीचा आहे हे अभ्यासावरून दिसून येत आहे.

तंबाखूच्या व्यसनाचे प्रकार पाहता व संभाव्य धोके पाहता केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा सुरु करण्यात आला आहे. समाजातील व्यसनाचे प्रमाण पाहता हे अभियान राबविण्यात आले आहे. आज असे दिसून येते की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये निकोटीन व्यतिरिक्त ४ हजार प्रकारचे विषारी रसायन आढळून आले आहे.

भारतातील तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाच्या प्रमाणावर प्रकाश टाकला तर १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत आहेत. महाराष्ट्रमध्ये साधारणतः ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचा वापर करतात. तंबाखूमुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, यकृतचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टिबी यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षघात, नपुंसकता, कमी वजनाचे व्यंग बाळ जन्माला येणे, मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे या सारख्या व्याधी जडतात. यामुळे अकाली मृत्युचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगरेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थाचे व्यसन सर्वाधिक केले जाते.

शालेय विद्यार्थ्यांमध्येही तंबाखू सेवनाच्या प्रमाणाचा चढता आलेख अत्यंत गंभीर आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाची माहिती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचणे आवश्यक आहे. तंबाखू व्यसनाविषयी काही प्रश्नही लोकांना पडतात.

तंबाखू सोडणे इतके अवघड का आहे ?

तंबाखूमधील निकोटीन हे मानसिक व्यसन निर्माण करते. तंबाखुचे सेवन न केल्यास घाबरल्यासारखे, मूड मध्ये बदल, चिंता व चिडचिड होते, जेवणानंतर ताणतणावाच्या वेळी सामाजिक गाठी-भेटी दरम्यान तंबाखू खाण्याच्या सवयीचा वापर सामान्य होतो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ चघळणे ही केवळ एक सवय नसून ती एक विधी बनते, ज्यामुळे तंबाखू सोडणे अवघड होते, परंतु कठोर प्रयत्न व निर्धारच या व्यसनाला दूर ठेवण्यास मदत करते.

याबरोबरच तंबाखू नियंत्रणासाठी केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय १०० यार्ड परिसरातील तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री थांबविण्यात आली आहे. तसेच कोटपा २००३ च्या कायद्याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये देखील तंबाखू मुक्त करण्यात येत आहे.

तंबाखू सोडण्याचे काय फायदे आहेत ?

तंबाखू सोडल्यानंतर काही दिवसात चव आणि वास सुधारतो. आठवडाभरताच श्वासातील दुर्गधी दूर होते. तोंडाचे आरोग्य चांगले होते, तोंडाचे व्रण काही महिन्यांत बरे होतात. हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी होतो आणि आयुर्मान वाढते तसेच आयुष्याची गुणवत्ता चांगली होते.

तंबाखू सोडल्यास कोणती सामान्य लक्षणे दिसून येतात ?

तंबाखू सोडल्यानंतर तीव्र इच्छा, चिडचिड, राग, अस्वस्थता, डोकेदुखी, लक्ष केंद्रित करण्यास अडचण, भूक वाढणे ही महत्वाची लक्षणे दिसून येऊ शकतात. त्यामुळे हायड्रेटेड राहा, आपले तोंड व्यस्त ठेवा. उदा. गम चघळा, दररोज व्यायाम करा. लक्षणे सहसा एक आठवड्यापर्यंत राहू शकतात आणि हळूहळू कमी होतात.

दीर्घकाळ तंबाखूमुक्त कसे राहता येऊ शकते?

जेवणानंतर, तणावाची स्थिती मित्रांचा दबाव हे तंबाखू खाण्याची इच्छा तीव्र करणारे ट्रिगर आहेत, ते ओळखा आणि त्यापासून दूर राहा. यासाठी डॉक्टर, कुटुंब आणि समुपदेशकाची मदत घ्या. तंबाखूमुक्त राहण्यासाठी छंद जोपासा, शारीरिक क्रीयकल्पामध्ये व्यस्त रहा, स्वतःला बक्षीस द्या, हार मानू नका.

तंबाखू सोडण्यासाठी कुठे मदत होते?

तंबाखू सोडण्यासाठी डॉक्टर आणि दंत शल्य चिकित्सक मदत करतात तसेच तंबाखुमुक्ती क्लिनिकची मदत घेऊ शकता. याबरोबरच राष्ट्रीय हेल्प लाईन 1800-11-2356 या क्रमांकावर संपर्क करू शकता. तंबाखू चघळण्याचे व्यसन सोडणे शक्य असून तंबाखू सोडण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. तुम्ही स्वतःला अनेक संकटापासून वाचवू शकता.

तंबाखूचे व्यसन सोडणे कठीण असले तरी अशक्य नाही. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी तंबाखूमुक्त जीवन स्वीकारुन तंबाखूविरुद्ध लोकचळवळ निर्माण करणे काळाची गरज आहे.

लेखक : जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय,यवतमाळ

Popular Articles