spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी यशोदा मैया – कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे

– महाविद्यालय संपर्क अभियान अंतर्गत ‘विद्यापीठ आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पालकांप्रमाणे विद्यार्थ्यांची काळजी करीत असून विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी यशोदा ‘मैया’ प्रमाणे असल्याचे प्रतिपादन माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ‘महाविद्यालय संपर्क अभियान ‘विद्यापीठ आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ व्हिएमव्ही वाणिज्य, जेएमटी कला व जेजेपी विज्ञान महाविद्यालय वर्धमान नगर येथून सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू मार्गदर्शन करीत होत्या.

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे राज्यपालनामीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य सुनील फुडके, श्री नागपूर गुजराती मंडळाचे व्यवस्थापन मंडळ सदस्य  धीरज पटेल, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय मुद्गल यांची उपस्थिती होती. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हिताच्या माता मंजुळाबाई वैद्यकीय सहायता निधी, कमवा व शिकवा योजना, विद्यार्थी सहायता निधी योजना, सावित्रीबाई फुले योजना यासह विविध योजना राबवित विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न विद्यापीठ करते. श्रीकृष्णाला जन्म जरी देवकीने दिला असला तरी पालन पोषण यशोदा मैयाने केले. त्याचप्रमाणे पालक म्हणून विद्यापीठ विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी पुढे बोलताना सांगितले. विद्यापीठाने विद्यार्थी हिताच्या योजना एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. मोबाईल ॲप मध्ये विद्यार्थी विकासाच्या संपूर्ण योजनांची माहिती, शासकीय भरती, रोजगार, इंटर्नशप, कौशल्य प्रशिक्षण त्याचप्रमाणे स्थानिक उद्योगांमध्ये उपलब्ध असलेली इंटर्नशिप व रोजगाराबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यास उपक्रमाला यश मिळेल तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल, असे कुलगुरू म्हणाल्या.

११ ऑक्टोंबर २०२५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यापीठ परिसरात आयोजित सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. त्याचप्रमाणे विद्यापीठ गीत गायन करीत असताना व्हिडिओ तयार करीत विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या लिंक वर अपलोड करण्याचे आवाहन कुलगुरूंनी यावेळी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विद्यापीठ गीतात देशातील तरुण कसा असावा याचे सुंदर वर्णन केले आहे. तरुण हा उद्योगी असावा, वीर असावा, कर्तुत्ववान, सकारात्मक भाव ठेवणारा, मेहनती तसेच चारित्र्यवान म्हणजेच शीलवान असावा. विद्यार्थ्यांनी कसे बनावे हे तुकडोजी महाराजांनी सांगितले आहे. आपला समाज कसा बनेल हे आजच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे चांगल्या समाज निर्मितीचे आपण समाजदूत असल्याचे कुलगुरू म्हणाल्या.

विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा – डॉ. समय बनसोड

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवित आहे. अधिसभा सदस्यांनी या योजनांचा आढावा घेतला असता तरतूद केलेल्या निधीच्या दोन टक्के निधी देखील खर्च होत नसल्याची बाब निदर्शनास आली. अनेकांनी परिश्रम घेऊन देखील विद्यार्थी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे नसल्याचे निदर्शनास आले. विद्यापीठ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ‘विद्यापीठ आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात असून विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांनी केले. योजनांची माहिती व्हावी म्हणून मोबाईल ॲप तयार करण्यात आले. वैद्यकीय सहायता योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ देणारे महाराष्ट्रातील प्रथम विद्यापीठ आहे. विद्यार्थी विकास योजनांसह ११ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गीत गायन करताना व्हिडिओ तयार करीत शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत अपलोड करावयाचा आहे. ११ ऑक्टोंबरच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या सोबतच २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. अधिसभा सदस्य सुनील फडके यांनी विद्यार्थी विकास योजना कशा प्रकारे लागू करण्यात आल्या याची माहिती दिली. प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने काही वर्षांपूर्वी अधिसभा सदस्यांच्या मागणीनुसार छापील स्वरूपात गरुडझेप नावाची पुस्तिका तयार केली आहे. विद्यार्थ्यांचा योजनांबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने मोबाईल ॲप देखील निर्माण करण्यात आले. विद्यार्थी योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून ‘विद्यापीठ आपल्या दारी’ हा उपक्रम विद्यापीठाच्या वतीने राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमर बोंद्रे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. अभय मुद्गल यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.