किशोर साहू, मौदा :- आयुर्वेदिक दवाखाना व उपकेंद्र चाचेर अंतर्गत “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियाना अंतर्गत तसेच २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ता.१० व ११ जून ला पीएम श्री जि. प. उच्च प्राथमिक शाळा चाचेरच्या मैदानावर दोन दिवसीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये ३ ते ६, ७ ते १०, ११ ते १६, १७ ते २५ व २६ ते ६० अशा विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने योगासन स्पर्धेत भाग घेतला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक दवाखाना चाचेर डॉ. मानसी गहूकार,समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र चाचेर डॉ. तक्षशिला मेश्राम तसेच योगा शिक्षक पौर्णिमा कावळे यांनी योगासन व प्राणायामाचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
पीएम श्री जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अनिल गडपायले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक विनोद लांडगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन सहारे होते. यावेळी आरोग्य सेविका इंदू मनगटे, उपाध्यक्ष अमिता वैद्य, सर्व अंगणवाडी सेविका, स्पर्धक, पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कार्यालय चाचेर यांचे विशेष सहकार्य लाभले.








