Home Latest News रुग्णालयातील औषध विक्रेत्याकडून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही

रुग्णालयातील औषध विक्रेत्याकडून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही

0
26

Ø मेडिकल असोशिएशनला सहायक आयुक्तांच्या सूचना

Ø पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

यवतमाळ :-  रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाशी संलग्नित, रुग्णालय इमारतीतील किंवा रुग्णालय परिसरातील विशिष्ट औषध विक्रेता आस्थापनातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. अ.मा माणिकराव यांनी मेडिकल असोशिएशनला दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सहायक आयुक्तांनी यवतमाळ जिल्ह्यातील मेडिकल असोशिएशन व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या सुचनानुसार रुग्णालयाने किंवा वैद्यकीय व्यवसायिकांनी रुग्णांना लिहून दिलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची प्रत रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना द्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रिस्क्रिप्शन देण्यास नकार देवू नये. लिहून दिलेली औषधे कोणत्याही वैध औषध विक्रेत्याकडून घेण्याची मुभा असल्याची माहितीही देणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व संबंधित रुग्णालयांनी मराठी व इंग्रजी भाषेत ठळक अक्षरात सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करावा. या फलकावर “रुग्णांना या रुग्णालयातील औषध विक्री दूकानातूनच औषध खरेदी नाही. रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कोणत्याही परवानेधारक औषध विक्रेत्याकडून औषध खरेदी करु शकतात” असे फलकावर नमूद करावे.

जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते व वैद्यकीय व्यवसायिकांना या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. या निर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्था किंवा व्यक्तींविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) डॉ. अ. मा. माणिकराव यांनी दिला आहे.