नागपूर :- पवार समाज कृती समिती (नागपूर शहर व नागपूर ग्रामीण) यांनी पूर्व खासदार तथा माजी आमदार कंकर मुंजारे यांनी चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात समितीने भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयातील अतिरिक्त सचिवांना निवेदन पाठविले. त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मध्यप्रदेशातील बालाघाट येथे एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान कंकर मुंजारे यांनी सम्राट राजा भोज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे पुलाला त्यांचे नाव देण्यास विरोध दर्शविताना कथितरीत्या आक्षेपार्ह वक्तव्य केले.या वक्तव्यामुळे राजा भोज यांना आदर्श मानणाऱ्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप समितीने केला आहे. पवार समाज कृती समितीने निवेदनात म्हटले की, चक्रवर्ती सम्राट राजा भोज हे भारतीय इतिहासातील महान शासकांपैकी एक असून त्यांच्या प्रशासन, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक कार्याचा गौरव इतिहासात आढळतो. देशातील विविध समाजघटक त्यांना आदराचे स्थान देतात. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या वक्तव्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. समितीने संबंधित प्रकरणाची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून वक्तव्य तथ्यहीन अथवा कायद्याच्या विरोधात आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच माजी खासदार म्हणून मिळणाऱ्या शासकीय सुविधा, मानधन किंवा इतर लाभांचीही नियमांनुसार समीक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 196 तसेच कलम 299 आणि 302 यांचा संदर्भ देत सामाजिक वैमनस्य किंवा धार्मिक- सामाजिक भावना दुखावण्यासंबंधीच्या तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. या निवेदनावर पवार समाज कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज रहांगडाले यांच्या स्वाक्षरीसह पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असून त्याच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, मध्यप्रदेशचे गृहमंत्री, बालाघाट जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत असे प्रसिद्धी पत्रकारद्वारे विजय पटले यांनी कळविले आहे.
Home Latest News माजी खासदार कंकर मुंजारे यांच्या वक्तव्याविरोधात पवार समाज कृती समितीचे केंद्रीय गृहमंत्रालयाला...




