spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नेरी गावात जुन्या वैमनस्यातून तरुणाचा खून

– उपसरपंचासह तिघांना नवीन कामठी पोलिसांनी केली चार तासांत अटक

– प्रेतयात्रेदरम्यान गावात तणावाची स्थिती

– पोलिसांनी प्रसंगावधानाने हाताळली परिस्थिती

कामठी :- नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेरी गावात जुन्या वैमनस्याच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. विवेक रमेश तांडेकर (वय २९ वर्षे, रा. नेरी, ता. कामठी, जि. नागपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून अवघ्या चार तासांतच नवीन कामठी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून तपासात मोठी कामगिरी बजावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक विवेक तांडेकर हा शेती करून उदरनिर्वाह करीत होता. बुधवार रोजी तो रामटेक न्यायालयात साक्ष देऊन सायंकाळी सात वाजता घरी आला होता. त्याचवेळी नेरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच देविदास उर्फ देवा बारसू वंजारी (वय ४२) यांनी विवेकला फोन करून “रेतीचा ट्रॅक्टर भरण्यासाठी पाल वीटभट्ट्याजवळ ये” असे सांगितले. विवेकने आईला सांगून घरून बाहेर पडला; मात्र रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, विवेकचा मोबाईल लोकेशन कन्हान नदीकाठावरील पालभट्ट्याजवळ असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नवीन कामठी पोलिसांनी मृतकाचा भाऊ अभिषेक तांडेकर आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता विवेक तांडेकर हा मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

मृतकाची आई हेमलता तांडेकर आणि भाऊ अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवा वंजारी याने एका महिन्यापूर्वी रेती वाहतुकीवरून झालेल्या वादातून विवेकला जातीवाचक शिवीगाळ करून जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याच वैमनस्यातून आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने विवेकचा खून केला असल्याचा संशय बळावला.

या माहितीच्या आधारे नवीन कामठी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक आणि गुन्हे शाखा युनिट ०५ यांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. काही तासांच्या तपासानंतर पोलिसांनी उपसरपंच देवा बारसू वंजारी (वय ४२), केशव सुकलाल गिरी (वय ३३), आणि साहिल प्रमोद घाटोळे (वय १९), सर्व रा. नेरी, यांना अटक केली.

चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, जुन्या वादातून विवेकच्या डोक्यावर लोखंडी रॉड आणि व्हीलपान्याने वार करून त्याचा जागीच खून करण्यात आला. साहिल घाटोळे याने गुन्हा करताना आरोपींची साथ केली व गुन्ह्यानंतर आरोपींना पळून जाण्यास मदत केली, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. संदीप पखाले, सहाय्य पोलीस उपायुक्त अंकुश खेडकर, व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी सकाळी मृतकाच्या नातेवाईकांनी नवीन कामठी पोलीस ठाण्याचा घेराव केला होता. वरिष्ठ पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले.

या प्रकरणात कलम १०३ (१) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

अटक कार्यवाहीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम, तसेच सफौ बिर्जू उईके, पोहवा नरेश खरगबाण, पोशि राहुल वाघमारे, नितेश नवधडे, नशीम अन्सारी यांचा विशेष सहभाग होता.

विवेक तांडेकर यांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन करून कडक पोलीस बंदोबस्तात नेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, मृतकाच्या प्रेतयात्रेदरम्यान गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. प्रेतयात्रेचा मार्ग आरोपी केशव गिरी याच्या घरासमोरून असल्याने काही संतप्त नागरिकांनी त्याच्या घरात घुसून वाद निर्माण केला तसेच घरावर दगडफेक केली. यावेळी तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधानाने स्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आरोपीच्या घरातील सदस्यांना सुरक्षिततेसाठी घरात बंद करून बाहेरून दार बंद केले आणि त्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला. पोलिसांच्या दक्षतेमुळे प्रेतयात्रा शांततेत पूर्ण झाली.

या घटनेनंतर संपूर्ण नेरी गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. या हत्याकांडाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.