spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हिंगणा तालुक्यात बोअरवेल खोदकामावर बंदी

– संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय; पुढील आदेशापर्यंत निर्बंध

हिंगणा :- संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता हिंगणा तालुक्यात बोअरवेल खोदण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. तहसीलदार नेहा मावसकर यांनी ही माहिती दिली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार खासगी व्यक्ती, शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, औद्योगिक संस्था तसेच बोअरवेल कंत्राटदारांना नवीन बोअरवेल खोदणे आणि जुन्या बोअरवेलची अधिक खोल खोदाई करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय यंत्रणेमार्फत पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या कामांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित शासकीय कार्यादेश किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी दर्शविणारी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. बंदी लागू होण्यापूर्वी सुरू असलेली प्रतिबंधित खोदकामे तातडीने थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. महसूल विभागाने नागरिक, शेतकरी आणि बोअरवेल कंत्राटदारांना प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे

Popular Articles