Home Latest News साईबाबा स्मृतिदिन कार्यक्रमामुळे ‘TISS’च्या १० विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण...

साईबाबा स्मृतिदिन कार्यक्रमामुळे ‘TISS’च्या १० विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

0
51

माओवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका झालेले दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टीआयएस) १० विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दिल्ली दंगलीतील आरोपी आणि फुटीरतावादी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ या कार्यक्रमात घोषणा दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक जी. एन. साईबाबा याची तुरुंगात तब्येत बिघडल्यानंतर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. निधनापूर्वी सहा महिने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती. साईबाबा याच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘टीआयएसएस’च्या आवारात विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्याचा आरोप आहे. याची माहिती अन्य विद्यार्थ्यांना समजताच ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. साईबाबा याचे छायाचित्र फाडल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला. याबाबतची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. याबाबतची माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांचे पथक ‘टीआयएसएस’च्या परिसरात पोहोचले. पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य हस्तगत केले. कोणत्याही परवानगीविना कार्यक्रमाचे आयोजन करून बेकायदा जमाव जमविणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त टीआयएसएसमध्ये आयोजित कार्यक्रमात वाद निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने तणाव वाढला. कार्यक्रमात साईबाबांचे छायाचित्र फाडल्याचा आरोप असून, परवानगीशिवाय जमाव जमवल्याप्रकरणी १० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
source : maharashtra times