Home Latest News भिक्खुसंघातर्फे दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचा जयघोष

भिक्खुसंघातर्फे दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचा जयघोष

0
43

– भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुध्दवंदना

– संविधान चौक, विमानतळ परिसरात अभिवादन

नागपूर :- करुणा, समता आणि प्रज्ञेचा संदेश देणारी पवित्र दीक्षाभूमी पुन्हा एकदा मंगळवारी धम्ममय वातावरणात न्हाऊन निघाली. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुध्दवंदनेच्या भव्य सोहळ्यात अनुयायींनी सहभाग घेतला. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत काशाय वस्त्रातील भिक्खु आणि भिक्खुनी संघ मंगळवारी सकाळी दीक्षाभूमीवर पोहोचला. तथागत गौतम बुध्द आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना भदंत ससाई यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित अनुयायांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बुध्द, धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती निष्ठा व्यक्त केली.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच पावन भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या स्मृतीने आजही ही भूमी तेजोमय आहे. दरवर्षी या दिवशी भदंत ससाई यांच्या उपस्थितीत आयोजित केली जाणारी बुध्दवंदना म्हणजे फक्त सामाजिक परिवर्तन, समानता आणि बंधुत्वाचा जिवंत संदेश आहे. याप्रसंगी भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते नागानंद, भंते नागवंश, भंते महानागा, भंते कश्यप, भंते अश्वजित, भंते बुध्दघोष, भंते धम्मप्रकाश, भंते संघ, भंते शांतीनागा, भंते धम्मशील, भंते धम्मदीप तसेच भिक्खुनी कुंडलिका, अनोमा, चित्ताबोधी, धम्मानंद, सुमेधा, बोधीआर्या, सुपवासा, करुणादीप, शीलानंद आणि विशाखा यांनीही उपस्थित राहून धम्मकार्याची अखंड परंपरा पुढे नेली. तत्पूर्वी भिक्खुसंघाने इंदोरा बुद्धविहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला तसेच संविधान चौक आणि विमानतळ परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नन्हा सवईथुल, आशिष शेंडे, अशोक गोवर्धन, अविनाश सवईथुल, आर्यन सवईथुल, अथर्वा सवईथुल, प्रवीण रंगारी, अमोल मेश्राम आणि श्रेयश गेडाम यांनी मोलाचे सहकार्य केले. दीक्षाभूमीवरील हा सोहळा केवळ ऐतिहासिक स्मरण नव्हे, तर समतेच्या, प्रज्ञेच्या आणि मानवतेच्या वाटेवर चालण्याची प्रेरणादायी दिशा आहे.