पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. पुणे शहरात भाजपने आधीच अनेक बडे नेते आपल्या पक्षात घ्यायला सुरुवात केली असताना आता पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. कधीकाळी राष्ट्रवादीचा गड असणारा पुणे जिल्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
याच अनुषंगाने भाजपने जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवत, अमोल कोल्हे यांनी वर्षभरापूर्वी फोडलेल्या अजित पवारांच्या नेत्याला भाजप प्रवेश दिला आहे. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठं नाव असणारे शेखर पाचुंदकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्येच शेखर पाचुंदकर यांनी अजित पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकत अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी शेखर पाचुंदकर यांना आंबेगाव तालुकाध्यक्ष पद सुद्धा बहाल करण्यात आलं होतं. मात्र आता वर्षभरातच पाचुंदकर यांनी तुतारीची साथ सोडत हाती कमळ घेतलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. शेखर पाचुंदकर हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मोठं नाव आहे. शिरूरच्या 42 गावांमध्ये शेखर पाचुंदकर यांचे मोठं वलय आहे. गेल्या वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पाचुंदकर हे आंबेगावचे तालुकाध्यक्ष झाले होते. मात्र वर्षभरातच त्यांनी शरद पवारांच्या पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.




