spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘महाज्योती’चे ११ शिलेदार यूपीएससी निकालात झाले असिस्टंड कमांडेंट

– केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेत विद्यार्थ्यांची बाजी

प्रशासकीय सेवांच्या क्षेत्रात ‘महाज्योती’ने आणखी एक दमदार कामगिरी नोंदवत आपल्या यशाची घोडदौड कायम ठेवली आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती)ने राष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय सेवांच्या क्षेत्रात आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा २०२५च्या ३५० पदांसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालात ‘महाज्योती’च्या प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या ११ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत असिस्टंट कमांडेंटपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत संधी देत अधिकारी घडविणारी अग्रगण्य संस्था म्हणून ‘महाज्योती’ने आपला ठसा अधिक भक्कम केला आहे.

राज्यातील बहुजन समाजातील, विशेषतः ग्रामीण आणि सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सहाय्यक कमांडंट) सारख्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘महाज्योती’ केंद्रबिंदू ठरत आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेच्या अंतिम निवड यादीत ऋषीप्रसाद सुहास देवरे (२० रँक), इंद्रजित महेश खाडे (३० रँक), प्रणित सुधाकर फटंगरे (३६ रँक), विनायक अजय नागरिया (४० रँक), प्रतिक गणेश जेव्हारे (५७ रँक), पल्लवी बाळासाहेब अहेर (९५ रँक), प्रज्वल राजकुमार शिंदे (९७ रँक), विश्वास अजयकुमार झरगाड (१४५ रँक), गौरव गुरुनाथ म्हात्रे (१७२ रँक), सुदर्शन नारायण नेहारकर (२३९ रँक) आणि पांडुरंग बाबुराव फोंडे (२५२ रँक) या ११ गुणवंतांनी स्थान मिळवले आहे. हे सर्व विद्यार्थी आता केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडेंट अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत, अशी माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि संस्थेच्या पारदर्शक प्रशिक्षण प्रणालीला दिले आहे. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी तसेच मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले होते. याशिवाय अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सराव मुलाखती आणि अद्ययावत अभ्यास साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक तयारी करून देण्यात आली. या सर्व प्रयत्नांच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले. यूपीएससीच्या निकालात ‘महाज्योती’च्या माध्यमातून यशस्वी बहुजन विद्यार्थ्यांची कामगिरी ही सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीतील एक मोठी क्रांती असल्याचे मा. मिलिंद नारिंगे यांनी नमूद केले.

‘महाज्योती’च्या यशाचा आलेख उंचावतच राहणार : अतुल सावे

यूपीएससीच्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेत ‘महाज्योती’च्या ११ विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे मत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष मा. अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे. ग्रामीण आणि बहुजन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात, हे या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. ‘महाज्योती’च्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व वाढत असून, ही सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थ्यांची सहाय्यक कमांडेंटपदी झालेली निवड ही ‘महाज्योती’च्या कार्याला मिळालेली मोठी पावती आहे. गुणवंतांना संधी देत अधिकारी घडविण्याची ‘महाज्योती’ची ही यशाची घोडदौड यापुढेही अशीच सुरू राहील, असा विश्वासही मा. अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.