spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

– ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन; विद्यार्थी व प्राध्यापकांचा मोठा सहभाग

हंसराज,भंडारा लाखनी :- येथील स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ २१ जून २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुक्ताई योग प्रशिक्षण आणि निसर्गोपचार समुपदेशन केंद्र, मुंबई यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख प्रशिक्षिका व वक्त्या म्हणून मुंबई येथील मुक्ताई योग प्रशिक्षण केंद्राच्या योग प्रशिक्षक तथा निसर्गोपचार समुपदेशक सीमा गुडधे (बुटे) उपस्थित होत्या. त्यांनी “Yoga for Healthy Ageing” (निरोगी वृद्धत्वासाठी योग) या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

गुडधे यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सूक्ष्म व्यायामांपासून ते उभे राहून, बसून, पोटावर आणि पाठीवर झोपून करावयाच्या विविध आसनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. यामध्ये प्रामुख्याने अनुलोम-विलोम, कपालभाती, प्राणायाम, नाडी शुद्धी क्रिया आणि वज्रासन या प्रकारांचा समावेश होता. “दैनंदिन योगाभ्यासाने शरीरातील पोटाचे व इतर गंभीर विकार दूर होतात. केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक शांततेसाठीही प्राणायाम करणे अनिवार्य आहे,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थी व नागरिकांना केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी आपल्या भाषणात आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आजच्या धावपळीच्या युगात धनसंपत्तीपेक्षा शरीराचे आरोग्य हीच खरी मोठी संपत्ती आहे. जर आपले शरीर सुदृढ असेल, तरच आपण सर्व गोष्टी साध्य करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंतर्भाव करावा,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा प्रमुख डॉ. सुधीर शहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रमोद भोयर यांनी मानले. या ऑनलाईन कार्यक्रमाला डॉ. शेंडे, डॉ. टेंभुर्णे, डॉ. देवघरे, डॉ. करवाडे, डॉ. खाडे, डॉ. ढोंगे, प्रा. सपाटे, प्रा. सिंघनजुडे, प्रा. वलथरे, प्रा. बोरकर, डॉ. टिचकुले, प्रा. बिसेन, प्रा. वारंगाने, डॉ. सिंग, डॉ. वंजारी, प्रा. सूर्यवंशी यांच्यासह सुनील भोयर, दीपक वाघाये, विलास वाघाये, राकेश उके व अन्य कर्मचारी उपस्थित होते. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवून योग दिन यशस्वी केला.

Popular Articles