नवी दिल्ली ९ : नेपाळात गेल्या काही दिवसांपासून जोर धरत असलेल्या ‘जेन झेड’ आंदोलनाने सोमवारी हिंसक वळण घेतले असून झालेल्या तीव्र संघर्षात तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नेपाळचे गृहमंत्री रमेश लेहरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई आणि राजकीय व्यवस्थेतील अपयश या मुद्द्यांवरून तरुणांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान राजधानी काठमांडूसह विविध शहरांमध्ये पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकींमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक, आगीचे प्रकार आणि पोलिसांच्या लाठीमार व अश्रुधुराच्या स्फोटांमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना तितक्याच कठोरपणे प्रत्युत्तर दिल्याने संघर्ष वाढत गेला आणि अखेरीस 19 तरुणांना जीव गमवावा लागला. शेकडो आंदोलक व सुरक्षादलाचे जवान गंभीर जखमी झाले असून रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. या घटनेनंतर देशभरात प्रचंड असंतोष पसरला असून सरकारविरोधात रोषाचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता सरकारवर आणखी मोठा दबाव निर्माण झाला असून वाढत्या आंदोलनाला आळा घालण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेपाळ सरकारला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे. या घटनाक्रमामुळे शेजारील देशांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेपाळच्या स्थैर्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.




