गडचिरोली ९ : गडचिरोली पोलिसांनी 4 सप्टेंबर 2025 रोजी मोठी कारवाई करत हैद्राबाद (तेलंगणा) येथून जहाल माओवादी शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा (वय 25, रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बीजापूर, छ.ग.) याला अटक केली. नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम या निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीने सप्टेंबर 2018 मध्ये मद्देड दलममध्ये भरती होऊन माओवादी संघटनेत प्रवेश केला होता, त्यानंतर त्याने गडचिरोली डिव्हिजनमध्ये डिव्हीसीएम शंकरअण्णा ऊर्फ शिवा यांचा अंगरक्षक म्हणून 2022 पर्यंत काम केले व पुढे पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून 2024 पर्यंत कार्यरत राहिला. त्याच्या कार्यकाळात त्याने पोलिसांसोबत झालेल्या 4 चकमकींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता तसेच एका खुनातही तो थेट सहभागी होता. गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या तीव्र अभियानामुळे त्याने 2024 मध्ये माओवादी संघटना सोडून घरी परतल्याची माहिती मिळाली होती, मात्र त्यानंतर तो आंध्रप्रदेशातील एंटापूर व नंतर हैद्राबाद येथे वास्तव्यास होता. त्याच्या अटकेवर महाराष्ट्र शासनाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली C-60 पथकाने केली असून न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.




