spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोर्शी येथे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरात २७८ रक्तदात्यांचे रक्तदान ! 

– मोर्शीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समाजहिताचा आदर्श उपक्रम!

– रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप; विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मोर्शी शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल २७८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्ण, प्रसूतीदरम्यान मातांना तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या भव्य शिबिराचे आयोजन केले. युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.

या सामाजिक उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला रस्ते सुरक्षा जनजागृतीचा संदेश देण्यासाठी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. “रक्तदानाने जीवन वाचवा आणि हेल्मेट वापरून स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवा” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. उपस्थितांनी या अभिनव संकल्पनेचे विशेष कौतुक केले.

स्व. अजितदादा पवार यांनी समाजहित, जनसेवा आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयंतीनिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता रक्तदान, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

कार्यक्रमादरम्यान माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी रक्तदात्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

यावेळी मोर्शी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शिबिराचे नियोजनबद्ध पद्धतीने संचालन केले. रक्तदात्यांच्या सुरक्षिततेची सर्व आवश्यक काळजी घेण्यात आली.

मोर्शी शहरात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिरामुळे समाजसेवा, रक्तदानाचे महत्त्व आणि रस्ते सुरक्षा या तिन्ही संदेशांचा प्रभावी संगम घडून आला. २७८ रक्तदात्यांच्या सहभागामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, हा उपक्रम मोर्शी तालुक्यातील सामाजिक कार्याचा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती वाढण्यास निश्चितच मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Popular Articles