नागपूर :- शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी शहर बस सेवेमध्ये असलेल्या डिझेल बसेस संख्या कमी झाली असून, त्या ऐवजी आता ई-बसेस रस्त्यावर धाव आहेत. सध्यस्थितीत २६० ई-बसेस शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. तसेच पुढील काळात यात आणखी बसेसची भर पडणार आहे. केंद्र सरकार पुरस्कृत असलेल्या या योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक असलेल्या वातानुकूलित २९ पीएम ई-बसेस नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बसच्या’ ताफ्यात सामील झाल्या आहेत. याबसेस आता लवकरच आरटीओ मार्फत केल्या जाणाऱ्या प्रक्रियेनंतर मनपाच्या सेवेत रुजू होणार आहेत. पर्यावरणपूरक असल्याने प्रदूषणात घट होणार आहे. येत्या वर्षभरात नागपूर महानगरपालिकेच्या ताफ्यात एकूण 150 पी एम ई-बसेस नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.
शहर बस वाहतुकीच्या वाढीला प्रोत्साहन व समर्थन देण्यासाठी केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत पी.एम.ई बस सेवा योजना देशाअंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये नागपूर शहराकरीता वातानुकुलीत 9 मीटर लांबीच्या 150 ई-बसेस प्राप्त होणार असून, सोबतच खापरी डेपो व कोराडी डेपो अशा दोन्ही डेपोचा विकास देखील मुलभुत सुविधेअंतर्गत करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून महावितरण अंतर्गत ईलेक्ट्रीक जोडणी करीता तथा स्थापत्य विषयक कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात मनपाची आपली बस सेवा कार्यरत आहे.
खापरी डेपो व कोराडी या दोन्ही डेपो पैकी कोराडी डेपो पूर्णपणे तयार झालेला असून खापरी डेपोचे काम प्रगती पथावर आहे.
पीएम- ई बस सेवा योजना
डेपो – कोराडी व खापरी
बसचा प्रकार- मिडी बसेस
एकूण बसेस – 150 ईव्ही बसेस
पी.एम.ई बस सेवा योजना देशाअंतर्गत पहिला टप्पा हा नागपूर करीता उपलब्ध झालेला असून, 29 ई-बसेस कोराडी डेपो येथे प्राप्त झालेल्या आहे. केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली येथून आलेल्या पथकाद्वारे कामाची संयुक्त पाहणी करण्यात आलेली आहे. या बसेस दिव्यांगाकरीता विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या असून रिमोट संचालित लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे.








