नागपूर :- वीज बिल भरता न आल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या नागपूर जिल्ह्यातील हजारो घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणतर्फे कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्चदाब आणि लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायी अशी ‘अभय योजना २०२६-२७’ लागू करण्यात आली असून, या विशेष योजनेमध्ये नागपूर जिल्ह्यातील तब्बल ९५ हजार ९४५ वीज ग्राहक पात्र ठरले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येण्याची आणि सुरळीत वीज सेवा मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या महत्त्वकांक्षी योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ग्राहकांच्या एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याजाची आणि विलंब आकाराची रक्कम १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. यामुळे मूळ थकबाकीचा बोजा प्रचंड प्रमाणात कमी होणार असून ग्राहकांना केवळ मूळ रक्कम भरण्याची मुभा मिळणार आहे. ही मूळ थकबाकी एकाच वेळी किंवा हप्त्यांनी भरण्याची अत्यंत सोयीस्कर सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. योजना सुरू झाल्यापासून १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी ‘अर्ली बर्ड रिबेट’ची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांची वीजजोडणी ३ वर्षांपर्यंत कायमस्वरूपी खंडित असल्यास १० टक्के, तर ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कायमस्वरूपी खंडित असल्यास तब्बल २० टक्के सवलत मिळत आहे. तसेच, लघुदाब घरगुती व व्यावसायिक वर्गवारी वगळून इतर सर्व लघु व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० टक्के व १५ टक्के सूट दिली जात आहे.
ग्राहकांच्या आर्थिक सुविधेचा विचार करून, लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेसाठी ६ समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांची सुविधा देण्यात आली आहे. तर उच्चदाब ग्राहकांना त्यांच्या थकबाकीनुसार ३ ते ६ व्याजमुक्त हप्त्यांचा लाभ घेता येणार आहे. यासोबतच, मंजूर भार २० किलोवॉटपर्यंत असलेल्या ज्या ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’चा पर्याय निवडला आहे, त्यांना मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत दिली जात आहे. विशेष म्हणजे, या योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकांवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत कृषी आणि सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळून इतर सर्व घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या नागपूर जिल्ह्यातील १३८ उच्चदाब आणि ९५ हजार ८०७ लघुदाब अशा एकूण ९५ हजार ९४५ ग्राहकांकडे सुमारे २३८ कोटी ११ लाख ९८ हजार १७४ रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील तब्बल ५७ कोटी ५४ लाख ५० हजार ५१५ रुपयांचे व्याज व विलंब आकार या योजनेमुळे पूर्णपणे माफ होणार आहेत.
‘अभय योजना २०२६-२७’ साठी अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ, पारदर्शक आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. ग्राहक महावितरणच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे अगदी सहजपणे आपले अर्ज सादर करू शकतील. वीज पुरवठा पूर्ववत करून घेण्यासाठी आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व पात्र ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले अहे.






