पतीने पत्नीला वाचवण्यासाठी दिलेली झुंज ठरली व्यर्थ; जिल्ह्यात यंदा २९वा बळी
चंद्रपूर ९ – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील मूल तालुक्यात सोमवारी पहाटे वाघाच्या हल्ल्यात ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सोमनाथ पर्यटनस्थळाजवळील बाबा आमटे प्रकल्प वसाहतीत राहणाऱ्या अन्नपूर्णा बिलोणे (वय ५२) यांच्यावर अंगणात भांडी घासत असताना वाघाने अचानक झडप घातली.
अन्नपूर्णा यांच्या आरडाओरडीनंतर पती तुलसीराम बिलोणे घराबाहेर आले. वाघ त्यांच्या पत्नीच्या गळ्याला घट्ट पकडून बसला होता. न घाबरता तुलसीराम यांनी पत्नीचे पाय खेचण्याचा आणि हातातील काठीने वाघाला हाणण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघाच्या ताकदीसमोर त्यांची झुंज अपुरी ठरली. अखेर वाघाने पत्नीचा बळी घेतल्यानंतरच माघार घेतली.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला
सोमवारीच दुपारी सडक अर्जुनी तहसीलमधील भद्रुटोला येथे वाघाच्या हल्ल्यात रामदास मन्साराम कापगते (४०) हे शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वर्ष २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत तब्बल २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात २७ जणांचा वाघाच्या हल्ल्यात, तर प्रत्येकी एका नागरिकाचा अस्वल आणि हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. स्थानिक नागरिक सातत्याने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी करीत आहेत, मात्र ठोस उपाययोजना अद्याप झालेली नाही.




