भंडारा ९ : भंडारा पोलिस ठाणे हद्दीतील पालांदूर-मानेगाव राज्यमार्गावरील गोंडेगाव येथील तलावाजवळील वळणावर सोमवारी सायंकाळी ५.०० वा. उभ्या असलेल्या मानव विकास एस.टी.बस वर दुचाकी आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार आशिष रमेश गोंडाणे (३७, रा. पालांदूर) यास गंभीर दुखापत झाल्याने लाखनी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती केल्यानंतर कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
विहीरगाव वरून पालांदुरमार्गे लाखनीकडे जाणारी मानव विकास एसटी बस (एमएच ०६ एस.८८३४) ही गोंडेगाव जवळून जात असताना समोर म्हशींचा कळप आल्याने बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने दुचाकीस्वाराने आमोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यावर मार लागल्याने तो गंभीर झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.




