नागपूर १० : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट चौकात मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला. ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबल विजय यादव यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार चालकाने हल्ला केला.
माहितीनुसार, ट्रॅफिक पोलिसांकडून “ऑपरेशन यू-टर्न” अंतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. त्याच दरम्यान संशयित कार थांबविण्यास सांगितल्यावर चालकाने धारदार शस्त्राने पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर वार केला. त्यानंतर आरोपी कार घेऊन पळून गेला, मात्र काही वेळाने परत येऊन पोलिसांशी शिवीगाळ व धमक्या दिल्या.
आरोपीची ओळख गोपालनगर येथील रहिवासी शोभित प्रभाकर मेश्राम (वय 45) अशी झाली आहे. त्याने स्वतःला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत पोलिसांचा गणवेश उतरविण्याची धमकी दिली.
गणेशपेठ पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, हल्ला करणे, शिवीगाळ करणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आणि धमक्या देणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. नंतर नोटीस देवून सोडण्यात आले.
घटना रात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास घडली. ट्रॅफिक ब्रांचमध्ये कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल विजय यादव आपल्या सहकाऱ्यांसह ड्युटीवर होते. “ऑपरेशन यू-टर्न” अंतर्गत कॉटन मार्केट चौकात ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात विशेष मोहीम सुरू होती. त्याच वेळी वेगाने धावणारी स्विफ्ट डिझायर कार त्यांच्या नजरेस पडली.जखमी पोलिस कर्मचाऱ्याचा उपचार मेयो रुग्णालयात सुरू आहे.




