मुंबई :– नुकत्याच झालेल्या आशिया चषक 2025 मधील भारत–पाकिस्तान सामन्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर घणाघात केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधील अग्रलेखातून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर तीव्र टीका करत हा सामना म्हणजे दहशतवाद्यांना अप्रत्यक्ष आर्थिक मदत असल्याचा आरोप केला आहे.
भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला असला, तरी या सामन्याबाबत महाराष्ट्रासह देशभरात विरोधाचे सूर उमटले होते. “निर्लज्जपणाचा कळस गाठून दुबईत सामना खेळवण्यात आला. भाजप नेते आणि त्यांचे समर्थक दारे-खिडक्या बंद करून तो पाहत होते. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला केंद्र सरकारच्या निर्णयाला मान द्यावा लागला. त्यामुळे मोदी सरकारचा मुखवटा फाटला आहे,” असे राऊतांनी लेखात म्हटले आहे.
बीसीसीआय अध्यक्षपदी जय शहा यांच्या नियुक्तीवरही राऊतांनी सवाल उपस्थित केला. “अमित शहांनी कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर आपल्या पुत्राला या पदावर बसवले? क्रिकेटमध्ये सट्टेबाजीचा पैसा आहे, त्यातून व्यापार करण्यासाठीच जय शहा यांची नेमणूक झाली. राष्ट्रभक्तीशी याचा काहीही संबंध नाही,” असा आरोप त्यांनी केला.
राऊत म्हणाले, “एका बाजूला पाकिस्तानी कलाकारांना बंदी घातली जाते, पण दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले जाते. भाजपची भूमिका दुतोंड्या गांडुळासारखी आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ देशाचा अपमान झाला तर मैदान सोडून जातो, मात्र आपण मात्र पाकिस्तानसोबत खेळत राहतो.”
या सामन्यात भारताच्या विजयालाही राऊतांनी “फिक्सिंग” म्हटले आहे. “26 निरपराध भारतीयांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी संघाशी सामना खेळून विजय मिळवल्याचा दिखावा करण्यात आला. कप्तान सूर्यकुमार यादवने हा विजय सैन्याला अर्पण करून थिल्लरपणा केला. हा शहीदांचा आणि सैन्याचा अपमान आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“सामना म्हणजे पैशांचा खेळ”
राऊत म्हणाले, “हा सामना म्हणजे केवळ पैशांचा खेळ आहे. दुबईतील या सामन्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हजारो कोटी रुपये कमावले. हे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाऊ शकतात. सामन्यावर झालेल्या सट्टेबाजीचे पैसेही पाकिस्तानातील दहशतवाद्यांना बळकट करण्याचे काम करतात.”



