नागपूर ०२ : दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते ०२ जुलै २०२५ रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत, नागपूर ग्रामीण जिल्ह्यात विशेष रात्रगस्त व कोबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक (गृह) विजय माहुलकर यांनी केले.
या काळात त्यांनी जिल्हाभरात सतर्क गस्त करत उमरेड उपविभागातील पोलीस स्टेशन कुही हद्दीत येणाऱ्या पाचगाव, कुही फाटा, डोंगरगाव, उंद्री, कळमना या ठिकाणी पायदळ पेट्रोलिंग करत कोबिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत कुही पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार तसेच दंगा नियंत्रण पथकातील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
ऑपरेशनदरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेलमधून सुटलेले गुन्हेगार, निगराणीखालील व्यक्ती आणि अवैध दारू विक्रेत्यांचे घर पंचासमक्ष तपासले गेले. यावेळी संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली.
याशिवाय पाचगाव बसस्टॉप येथे नाकाबंदी करण्यात आली होती. या ठिकाणी संशयित वाहनांची तपासणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय करण्यात आला.
पोलीस विभागाने जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि कायदा राखण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.





