नागपूर :- शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनाची अर्ज स्वीकृती व पडताळणी ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तत्काळ नोंदणी करण्यासाठी मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीच्या अनुसूचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकाच्या पाल्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती), इयत्ता नववी व दहावीत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेतील अनुसूचित जातीच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने योजनांचा समावेश आहे. नमूद योजनांसाठीची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने अर्ज स्वीकृती आणि नुतनीकरणाची ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे.
वर नमूद सर्व शिष्यवृत्तींसाठी https://prematric.mahait.org/Login/Login महाडीबीटी प्रणालीच्या वेब लिंकवर शाळा व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यातृत यावी.
महाडीबीटी प्रणाली वेब लिंक- https://prematric.mahait.org/Login/Login, मुख्याध्यापक लॉगीन तयार करणे महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या नोंदणीसाठी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी यूजर आयडी व पासवर्ड यापूर्वी देण्यात आलेले आहे. शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी शाळेची मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करावी. विद्यार्थी प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी, योजनेची निवडीसाठी संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करणे.
नमुद केलेल्या योजनांकरिता सर्व शाळांनी महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तत्काळ नोदणी करावी. एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी केले आहे.



