spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवा निर्णय मागे; मराठी अस्मितेचा विजय, मनसे-शिवसेनेचा जल्लोष.

मुंबई ०५ : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीबाबतचा निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी मुंबईच्या वरळी येथे एकत्र येत विजयोत्सव साजरा केला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं.

दरम्यान, मीरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका दुकानदाराला मारहाण केल्याच्या घटनेनंतर शहरातील अमराठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. यावरही या मेळाव्यात भाष्य करण्यात आलं.राज ठाकरे म्हणाले, “हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणं ही विजयाची बाब असली तरी हे सत्ताधारी पुन्हा जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. मीरा-भाईंदरमध्ये झालेल्या घटनेबाबत सांगायचं झालं, तर कुठल्याही व्यापाऱ्याच्या कपाळावर लिहिलं नव्हतं की तो गुजराती आहे. बाचाबाची झाली आणि तो व्यक्ती गुजराती निघाला, एवढंच. मात्र काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी ‘गुजराती व्यापाऱ्याला मारहाण’ अशा बातम्या चालवल्या, ज्याची गरज नव्हती.”

त्यांनी पुढे स्पष्ट केलं, “मराठी भाषा प्रत्येकालाच यायला हवी, हे स्पष्ट आहे. मात्र विनाकारण कुणावरही हल्ला करायची गरज नाही. कोणाला कानाखाली मारायची वेळ आलीच, तर त्यांची चूक असली पाहिजे. आणि अशा घटना घडल्यास त्याचे व्हिडिओ काढू नका. मारणारा सांगत नाही की मी मारलं, मार खाणारा सांगतो की मला मारलं. त्यामुळे अनावश्यक प्रसिद्धी टाळा.” उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत टोला लगावला. ते म्हणाले, “आज अनेक बुवा, महाराज टाचण्या मारण्यात, लिंबू कापण्यात किंवा अंगारे-धुपारे करण्यात मग्न आहेत. अशा अंधश्रद्धांशी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी लढा दिला. आम्ही त्यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत आणि म्हणूनच तुमच्यासमोर ठामपणे उभे आहोत.” हा मेळावा मराठी अस्मितेच्या आणि भाषेच्या गौरवाचा एक सशक्त आवाज ठरला.

@filephoto

Popular Articles