spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मन विखंड झालेल्या पगारी संपादक राऊतांना अखंड भारताचे मोल कसे कळणार

– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा खरमरीत सवाल

मुंबई :- खा.संजय राऊत यांनी उबाठा गटाचे मुखपत्र असलेल्या सामना च्या अग्रलेखात पाकधार्जिणे विचार मांडून सामना हे आता पाकिस्तानचे मुखपत्र असल्याचा नमुना सादर केला आहे. अखंड भारताबद्दल केवळ व्याख्याने झोडायची असे विचार अग्रलेखातून मांडत भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राऊतांनी टीका केली आहे. मन विखंड झालेल्या, सतत पाकधार्जिणी भूमिका मांडणा-या पगारी संपादक राऊतांना अखंड भारताचे मोल आणि अर्थ कळणार नाही. वायफळ बडबड करण्यात आणि फुटकळ लिखाणात ते व्यग्र आहेत असे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना राऊत यांनी दहा वेळा विचार करावा. संघ आणि भाजपा सातत्याने अखंड भारतासाठी झटत आहेत, मैदानावर लढत आहेत. 370 कलम हटवणे हे अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे आणि येणाऱ्या काळात अखंड भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम भाजपा आणि संघ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी ‘मोफत राशन’ मिळवणाऱ्या 80 कोटी जनतेचा अपमान केला. लाडक्या बहिणींना विकाऊ मतदार म्हणून हिणवण्याचे काम उद्धव, राऊत हे सातत्याने करतात. मतदारांच्या आत्मसन्मानाला, लाडक्या बहिणींच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचे काम करणा-यांना आगामी पालिका निवडणुकीत मतदार मतपेटीतून राग व्यक्त करत त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा बन यांनी दिला.

उबाठा सेनेच्या पदरात लागोपाठ भोपळा पडत आहे. आधी गोवा मग उत्तर प्रदेश आता वेळ आहे बिहार निवडणुकीत भोपळा पदरी पडण्याची, अशी बोचरी टीका बन यांनी केली. बिहारमध्ये निवडणूक लढवून आपली ताकद दाखवा. ट्विटरवरून नव्हे तर निवडणुकीच्या रिंगणात उतरून दाखवा असे आव्हान बन यांनी दिले. किती जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होणार हे निकालाअंती कळेल, बिहारच्या मतदारांचा अपमान करणा-यांना जनता धडा शिकवेल असेही त्यांनी नमूद केले.

संविधानावर बोलणा-या राऊतांची ढोंगी भूमिका

संजय राऊतांनी संविधानाच्या गप्पा करू नयेत. संविधानाचा इतकाच पुळका असेल तर इंदिरा गांधींचा निषेध करण्याचे धारिष्ट्य दाखवा असे आव्हान बन यांनी दिले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडवले होते त्याबद्दल संजय राऊत यांनी सामनातून एखादा अग्रलेख लिहीण्याची हिंमत दाखवावी. संविधानाची हत्या काँग्रेसच्या कार्यकाळात झाली होती, 100 वेळा संविधानाची मोडतोड करण्याचे पाप हे काँग्रेसचे आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधान हे अत्यंत प्रिय असून संविधानानुसार काम केले जाते याचा सार्थ अभिमान असल्याचे बन यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये पर्यायी भाषा म्हणून उर्दू भाषा शिकवण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह राहील. उर्दू भाषेचा आग्रह इथे चालणार नाही असा इशाराही बन यांनी दिला.

सरन्यायाधीशांवरील हल्ला निषेधार्ह

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपाने निषेध केला आहे. हा देश घटनेने, संविधानाने चालतो. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर एखादी व्यक्ती हल्ला करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेकडे लक्ष देऊन आहेत आणि तातडीने कारवाई केली जाईल असे बन म्हणाले.

Popular Articles