महिला उद्योजकता व कौशल्य उन्नतीसाठी भव्य उपक्रम

0
66

– शिलाई मशीन व एम्ब्रॉयडरी टूलकिट चे वाटप.

यवतमाळ :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्थानिक हस्तकला व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी, एमआयडीसी बंजारा आर्ट्स फाऊंडेशन यवतमाळ येथे एक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रायोजक हस्तशिल्प विकास कार्यालय, नागपूर, यांच्या सौजन्याने व स्नेहदीप बहुउद्देशीय संस्थे अंतर्गत, ५० महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांचे कौशल्य वाढवणे हा आहे. हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या हस्तशिल्प विभागाच्या महिला उद्योजकता व कौशल्य उन्नती कार्यक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आला होता. या विशेष प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थान माजी प्राचार्य डॉ. लक्ष्मण उत्तरवार यांनी भूषवले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हस्तशिल्प विकास कार्यालय, नागपूर येथील अससिस्टन्स डायरेक्टर अवधेश ठाकूर उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. राजेश जाधव यांची उपस्थिति मोलाची ठरली.

या कार्यक्रमास यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक विशेष अतिथी म्हणुन लाभले. तसेच प्राध्यापक डॉ. ओंकार आदर्श महाविद्यालय धामणगांव हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात यश उत्तरवार यांच्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उपस्थितांना कार्यक्रमाचे उद्दिष्ट याची माहिती दिली व हस्तशिल्प क्षेत्रातील संधींबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश राठोड यांनी केले.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना आधुनिक शिलाई मशीन व एम्ब्रॉयडरी टूलकिट वाटप करण्यात आले. या मशीनद्वारे त्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून, स्थानिक बाजारपेठेत शिवणकाम, फॅशन डिझाईन, हातकागद वस्त्रनिर्मिती यासारख्या क्षेत्रांत आपला ठसा उमठविता येईल.

हा उपक्रम ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांमध्ये आत्मनिर्भरता जागवणारा असून, भविष्यात अधिक महिलांपर्यंत असे उपक्रम पोहोचावेत अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हस्तशिल्प विकास कार्यालय, नागपूर, व स्नेहदीप संस्था यांनी आयोजन केले.