spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बिल्डथॉन 2025 निमित्त प्रेरणादायी शपथविधी व नॉवेल्टी लॅब प्रदर्शन

किशोर साहू, मौदा :- बिल्डथॉन 2025 शासन निर्णयाच्या अनुषंगाने श्रीमती राजेश्वरी रेड्डी स्कॉलर कॉन्व्हेंट, कोदामेंढी येथे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी प्रेरणादायी शपथविधी कार्यक्रम व “नॉवेल्टी लॅब” प्रदर्शन संपन्न झाले.

या कार्यक्रमात झेलॉस्टेक सोल्युशन्स या शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थेद्वारा “नॉवेल्टी लॅब” सादर करण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी “ओकल टू लोकल” या संकल्पनेअंतर्गत समाजातील विद्यमान समस्यांचे निराकरण स्थानिक साधनसंपत्ती, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी विचारांच्या साहाय्याने कसे करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका डी. विनिता रेड्डी यांनी भूषविले.याप्रसंगी समाजसेवक व राजनीततज्ञ अशोक हटवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

त्यांनी आपल्या भाषणात भारत सरकारच्या बिल्डथॉन 2025 या भविष्यदर्शी दृष्टिकोनाचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच, आपल्या परिसरातील काही शाळा अजूनही अजागृत अवस्थेत असल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि सर्व शिक्षकांना जागरूकतेने शासनाच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

हटवार यांनी उपस्थित शिक्षकवृंदांना बिल्डथॉन 2025 चे उद्दिष्ट यशस्वीरित्या राबविण्याकरिता प्रेरणा दिली तसेच शासनाच्या धोरणांविषयी निष्ठा व विद्यार्थ्यांना पुस्तकापलीकडील जग दाखविण्याच्या दृष्टीने अकरा कलमी शपथविधी घेतला.

संस्थेचे संचालक सत्यनारायण रेड्डी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कल्पनांचे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी उपाय शोधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “स्थानिक विचारांनी जागतिक दर्जा प्राप्त करण्याचे” आवाहन केले.

शिक्षकांनी शासनाच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याची व विद्यार्थ्यांना नवोन्मेषी, समाजाभिमुख आणि जबाबदार नागरिक बनविण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकवृंदांनी केले, तर उपस्थित विद्यार्थी, पालक आणि स्थानिक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.