मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रंग दे नागपूर’ स्पर्धेत विजेत्यांचा गौरव

0
41

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘रंग दे नागपूर’ या भव्य भित्तिचित्र स्पर्धेला नागपूरसह राज्याच्या इतर भागातील चित्रकारांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. दोन दिवसांत शहराच्या भिंतींवर साकारलेल्या या कलाकृती साकारणाऱ्या कलावंतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. परिणय फुले, आमदार आशिष देशमुख, आमदार कृपाल तुमाने, आमदार.  चरणसिंग ठाकूर, आमदार मोहन मते, आमदार संजय मेश्राम, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे,मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ पियूष आंबुलकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, स्पर्धेचे समन्वयक अभिजीत मौंदेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या देखरेखीत आयोजित या स्पर्धेचा उद्देश मनपाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्यातील ‘स्वच्छ व स्मार्ट नागपूर’च्या स्वप्नांचे दर्शन कलेच्या माध्यमातून घडविणे हा होता. या स्पर्धेत १८ वर्षांवरील विद्यार्थी आणि व्यावसायिक अशा दोन गटांत सहभाग घेण्यात आला. नागपूरसह मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांतून आलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली. एकूण ११८ गटांनी प्रवेशिका भरल्या होत्या, त्यापैकी मनपाने दिलेल्या संकल्पनेनुसार ९२ गटांच्या प्रवेशिका पात्र ठरल्या. प्रत्येक गटात ३ ते ५ चित्रकार होते, ज्यामुळे एकाचवेळी जवळपास तीनशेहून अधिक चित्रकारांनी नागपुरातील या रंगोत्सवात सहभाग नोंदवला.

चित्रकारांनी चार संकल्पनांवर आधारित भित्तीचित्रे साकारली यात नागपूर ॲट ७५’: शहराचा अनेक दशकांतील विकास आणि परिवर्तनाचा प्रवास, ‘स्वच्छ, हरित आणि स्मार्ट नागपूर’: स्वच्छता, हिरवळ आणि स्मार्ट सिटीच्या विकासाचे चित्रण,नागपूरची संस्कृती, इतिहास आणि वारसा, ‘नागपूर- द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ यांचा समावेश होता. चित्रकारांनी दीक्षाभूमीजवळील सुंदरलाल राय मार्ग (नीरी मार्ग) येथे, तर हौशी तसेच व्यावसायिक चित्रकारांनी सीताबर्डीतील फ्रिडम पार्क येथील भिंतीवर आपली कला रेखाटली. नागपुरातील शासकीय चित्रकला महाविद्यालय, नटराज आर्ट अँड कल्चर कॉलेज, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात प्रमुख सहभाग घेतला. मनपाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

असे आहेत विजेते..

विद्यार्थी गट आणि व्यावसायिक गट अशा दोन्ही गटांतील विजेत्यांची पुरस्कार प्रदान करण्यात आले.

*विद्यार्थी गट

चित्रकार क्रिश कटारिया व गट यांमी प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. तर अनुराग मानकर व गट यांना द्वितीय, प्रतिक खापरे व गट यांना तृतीय, तर निसर्ग गाणकवार व गट आणि केशर पराटकर व गट यांना प्रोत्साहनपर पारितोषिक मिळविले आहे.

*व्यावसायिक गट

चित्रकार शैलेश निंदेकर व गट यांनी प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर नंदकिशोर सलवाटकर व गट द्वितीय, शैलेश बोंदले व गट यांना तृतीय तर अमित गोंनाडे व गट, सागर बावणे व गट यांना प्रोत्साहनपर पारितोषिक मिळविले आहे.