नागपूर 09 – रविभवन नागपूर येथे ५ जुलै रोजी नुकत्याच झालेल्या कार्यशाळा प्रसंगी सामाजिक संस्थांच्या संघटनाकरीता महाराष्ट्र एनजीओ समिती च्यावतीने निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील 200 सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेमध्ये संस्था संघटन व सिएसआर निधी संदर्भात महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. युवराज येडुरे, राज्य उपाध्यक्षा डॉ. सुनिता मोडक, राज्य चिटणीस एल. के. डोळस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तज्ञ सल्लागार सारिका आटोळे, चंदा गान उपस्थित होते. मागिल ७ वर्षात नागपूर जिल्ह्यात 122 करोड निधी खर्च केला गेला हे कागदोपत्री दाखविण्यात आले. मात्र तो निधी प्रत्यक्षात दिला जात नाही. याकरिता शासन स्तरावर चौकशी समिती नेमण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कार्यशाळेत करण्यात आली. समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधी द्या अन्यथा आगामी काळात महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एनजीओ समितीने दिलेला आहे. कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र एनजीओ समितीच्या राज्य सदस्या शितल पाटील व नागपूर विभागाचे अध्यक्ष सारंग धोटकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागीय संपर्क प्रमुख अविनाश इलमे, सदस्य तुषार आरघोडे, संध्या भोयर यांनी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविक सारंग धोटकर यांनी तर संचालन नलिनी शेरकुरे यांनी केले.
सीएसआर निधी सामाजिक संस्थांना द्या ! अन्यथा आंदोलन महाराष्ट्र एनजीओ समितीचा शासनाला इशारा








