सुशांत घाटे,चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. तर दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रजननक्षम मादा वाघिणींचा अभाव असल्याने तेथील वाघसंख्या वाढण्यात अडथळा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील नुकत्याच प्रजननक्षम झालेल्या आठ वाघिणींना सह्याद्रीत स्थलांतरित करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. मात्र या निर्णयाला स्थानिक गाईड, जिप्सी चालक आणि नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. परिणामी, सह्याद्रीतील वाघ पुनर्वसन मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चंदा-चांदणी’ म्हणजे झरणी आणि छोटा मटका जोडीची पिलं
‘चंदा’ आणि ‘चांदणी’ या दोन्ही वाघिणी झरणी आणि छोटा मटका या प्रसिद्ध टायगर जोडीच्या पिल्या आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच निडर आणि उत्साही स्वभावामुळे या दोन्ही वाघिणी पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. सध्या त्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अलिझंजा, नवेगाव आणि निमढेला परिसरात वास्तव्य करतात.अलीकडेच प्रजननक्षम झालेल्या या वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी स्थानिकांनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही वाघिणी सध्या गर्भवती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अशा अवस्थेत त्यांचे स्थलांतर धोकादायक ठरू शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
स्थानिकांच्या विरोधामागची कारणं
जन्मभूमी आणि स्थैर्य: चंदा आणि चांदणी या वाघिणींचा जन्म याच परिसरात झाला असून त्या इथेच स्थिरावल्या आहेत.संघर्षविरहित सहअस्तित्व: आजपर्यंत या वाघिणींनी कुठल्याही माणसावर किंवा गुरांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे या भागात मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्नच निर्माण झालेला नाही.रोजगाराचे मुख्य साधन: या वाघिणींमुळे स्थानिक गाईड, जिप्सी चालक आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
१०४ कुटुंबांचा उदरनिर्वाह: या परिसरात कार्यरत असलेल्या सुमारे 104 गाईड आणि जिप्सी चालकांचा — म्हणजेच त्यांच्या कुटुंबांचा — उदरनिर्वाह या दोन वाघिणींवर अवलंबून आहे.सध्या या दोन्ही वाघिणी गर्भवती असल्याने स्थलांतरामुळे त्यांच्या आणि त्यांच्या बछड्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या वाघिणी ताडोबाचे मुख्य आकर्षण ठरल्याने स्थानिकांसह पर्यटकदेखील त्यांना इथेच ठेवण्याच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.
संवर्धन विरुद्ध उपजीविका दोन्हींचा समतोल आवश्यक
स्थानिकांचा ठाम आग्रह आहे की, “या वाघिणींच्या स्थलांतराने ताडोबाच्या पर्यटनावर आणि स्थानिक रोजगारावर मोठा परिणाम होईल.” तर वन विभागाचे म्हणणे आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी आणि वाघ प्रजातींचे पुनर्वसन करण्यासाठी हे स्थलांतर अत्यावश्यक आहे. त्यातच आता स्थानिकांचा विरोध आणि वन विभागाचा निर्णय या दोन्हींच्या संघर्षात ‘चंदा-चांदणी’चं भवितव्य काय ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.








