spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुसद प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत हर्षी केंद्र अव्वल

– विजेत्यांना समारंभात बक्षिसांचे वितरण

यवतमाळ :- ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत शासकीय आश्रम शाळा हर्षी येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन अमोल मेतकर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धेसाठी वसंतपूर व हर्षी केंद्रांमधून तब्बल ६५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. तीन दिवस विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार उत्साहात पार पडले. अमोल मेतकर यांच्या प्रयत्नांतून जिल्हाधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शाळेचे मैदान सपाटीकरण करण्यात आल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

८ नोव्हेंबर रोजी क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. तसेच भोजनानंतर आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर झाला.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोग २०२४ मध्ये निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी भेट दिली. यात अंकीता कांती, साधना दिवाकर, टी. नायगारासन, आशितोष मिश्रा, शुभम गौरव, लोंढे व  प्रसाद कुलकर्णी यांचा समावेश होता. त्यांनी खेळाचा आनंद घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष साजरे करण्यात आले. त्यानिमित्त विज्ञान व कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल मेतकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनील बारसे, प्रकल्प अधिकारी कळमनुरी उपस्थित होते. प्रा. सेता व प्रा. खाडे पी.एन. कॉलेज, पुसद यांनी परीक्षक म्हणून सहभाग घेतला.

१० नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी डॉ. सुनील बारसे यांनी “जिद्दीच्या जोरावर यश प्राप्त होते” असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात अमोल मेतकर यांनी “खेळासोबत अभ्यासाकडेही लक्ष द्यावे” असा संदेश दिला व विभागस्तरासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

हर्षी केंद्राने ४८३ गुणांसह अव्वल स्थान, तर वसंतपूर केंद्राने ३३३ गुणांसह द्वितीय स्थान पटकावले. विजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे, तसेच वैयक्तिक विजेत्यांना पदके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवींद्र घड्याळे, मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा वडगाव शिंदे यांनी केले, तर संचालन समाधान जाधव व नारायण राऊत यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, शिक्षकवर्ग व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles