अॅड. हरिदास आवळे बाबू यांचा ११० वा जयंती महोत्सव, परिसंवाद व पुरस्कार वितरण समारंभ
नागपूर १० : रिपब्लिकन नेते कर्मवीर अॅड. हरिदास आवळे बाबू हे आंबेडकरी चळवळीचे सच्चे ध्वजवाहक होते. बाबासाहेब आंबेडकरानंतरच्या या नायकांनी मोठ्या निष्ठेने आंबेडकरी चळवळ पुढे नेली व बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविले. आंबेडकरी चळवळीतील अशा नायकांमुळे नवी पिढी घडू शकली. सध्याच्या स्थितीत आंबेडकरी लेखक, विचारवंत, नेते, कार्यकर्ते यांच्यात एकसूत्रता नाही. त्यामुळे आंबेडकरी जनता संभ्रमात आहे. केवळ सत्तधारी पक्षावर टीकाटिप्पणी करीत बसलो तर आपण नेहमीच सत्तेबाहेर राहू. त्यामुळे व्यापक राजकीय भूमिका घेऊन आपली राजकीय लढाई लढली पाहिजे व ही लढाई केवळ पदासाठी नाही तर आंबेडकरांची विचारांच्या प्रतिष्ठापनेसाठी असली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानद्वारे रिपब्लिकन नेते कर्मवीर अॅड. हरिदास आवळे बाबू यांचा ११० वा जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर कामठी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ‘कर्मवीर हरिदास सावळे यांची सम्यक दृष्टी व वर्तमान स्थितीत आंबेडकरी अनुयायांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक जामगडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून व वक्ते म्हणून दै. लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. रणजीत मेश्राम, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. पुरणचंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.ती.
या प्रसंगी श्रीमंत माने म्हणाले, ज्यांच्यात वर्तमानात संघर्ष करण्याचे व भविष्याचा वेध घेण्याचे सामर्थ्य नसते ते इतिहासात डोकावून स्वतःला संकुचित करून घेत असतात. आज आपला देश केवळ माध्यमांच्या शीर्षकांवरच महासत्ता आहे. मुळात ऐंशी टक्के लोक मोफत धान्यावर जगतात. हे दृश्य फार भीषण आहे. जातीय विचारांच्या पलीकडे जाऊन आर्थिक विचारांवर सर्व वर्गातील लोकांनी एकत्र येऊन विशाल आंदोलन उभे केले तरच या देशात आर्थिक न्याय प्रस्थापित होऊ शकेल, असे ते म्हणाले
प्रा. रणजीत मेश्राम म्हणाले, सत्तेची अपेक्षा करताना केवळ बेरजांचे राजकारण करून सर्व मूल्ये गहाण ठेवावी हे डॉ. आंबेडकरांना कधीच मान्य नव्हते. डॉ.आंबेडकरांचे संविधानसभेतील शेवटचे भाषण हे खऱ्या अर्थाने आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या गाभा आहे. आंबेडकरी नेत्यांनी एककल्ली विचार सोडून साकल्याने विचार करणे आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्ष लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नात सर्वात आघाडीवर होता. पक्ष स्थापनेच्या प्रारंभीच्या काळात स्वतंत्र मजूर पक्ष व भारतीय रिपब्लिकन पक्षाला भरघोस यश मिळाले होते. आज रिपब्लिकन हा केवळ एका विशिष्ट वर्गाचा पक्ष म्हणून शिल्लक राहिला. सेपरेशनची लढाई लढताना आपण आयसोलेशन मध्ये जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
डॉ. सिद्धार्थ गायकवाड म्हणाले, सध्याची नवीन पिढी चळवळीपासून लांब जात आहे. संविधानाच्या अंमलबजावणीच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही शेवटच्या घटकापर्यंत संविधान पोहोचले नाही. देशात बेघर, निरक्षर, उपासमारीने ग्रस्त लोकांची संख्या फार मोठी आहे. नव्या पिढीने संविधानातील मूल्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवून सामाजिक उत्कर्षासाठी योगदान दिले पाहिजे. ज्यांना राजकारण करायचे असेल, त्यांनी आधी निष्ठेने समाजकारण करणे आवश्यक आहे तरच ते राजकारणात यशस्वी ठरू शकतात, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात विनायक जामगडे म्हणाले, कर्मवीर हरिदास आवळे बाबू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानतर रिपब्लिकन पक्षाला लोकशाही प्रणालीनुसार चालविण्याचा आग्रह केला. बेघर लोकांना सहकारी संस्था काढून निवासाची सोय केली. बेकारांना रोजगार व उद्योग मिळवून दिले. मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाची लढाई लढले. ते सच्चे आंबेडकरी लोकशाहीचे भोक्ते होते. त्याची जयंती व स्मृति दिन मागील ५५ वर्षांपासून कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात येते. या वर्षी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांच्या नावांनी कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, हा उपक्रम दरवर्षी सुरू राहील असेही ते म्हणाले.
या प्रसंगी आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीतील निष्ठावंत, सिद्धान्तवादी नायकांच्या स्मृती समाजात जिवंत राहाव्या म्हणून त्यांच्या महान कार्याच्या स्मरणार्थ व गौरवार्थ आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्य करणारे कार्यकर्ते, नेते, लेखक व विचारवंत यांना कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक जामगडे यांना ‘कर्मवीर हरिदास आवळे जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते करुणाकर उके यांना ‘माजी नगरसेवक व रिपब्लिकन नेते दिवगंत आकांत माटे समाजभूषण पुरस्कार’, ज्येष्ठ आंबेडकरी नेते मा. हरीश जानोरकर यांना ‘माजी महापौर रिपब्लिकन नेते सखाराम मेश्राम समाजभूषण पुरस्कार’, आंबेडकरी लेखिका व वक्त्या प्रा. डॉ. सविता कांबळे यांना ‘माजी स्थायी समिती अध्यक्षा व रिपब्लिकन नेत्या दिवंगत ताराबाई मेश्राम समाजभूषण पुरस्कार’, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अॅड. व्ही. पी. बोरकर यांना ‘रिपब्लिकन नेते दिवगंत गजानन आवळे समाजभूषण पुरस्कार’ प्रदान आले. तर यशवंत गजघाटे,यादवराव पाटील,नानाजी गायकवाड,विनोद आटे, प्रभाकर पाणतावणे,नामदेव खोब्रागडे, मधुकर बोरीकर, श्रीराम गणेर,रामभाऊ आंबुलकर,भाऊराव वानखेडे, सचिन कांबळे, आनंद तेलंग, अरुण गेडाम, पत्रकार संतोष सिंग लांजेवार या कृतिशील कार्यकर्त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. याप्रसंगी विनायक जामगडे लिखित प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा एल्गार या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संचालन डॉ. राष्ट्रपाल यांनी लकेले.समारोहाला आंबेडकरी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..





