खापा :- क्रांतिवीर, जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून त्यांना अभिवादन केले. स्थानिक जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खापा येथे दि. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने विद्यालयात जनजाती गौरव सप्ताह राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सप्ताहाचा समारोप निमित्य दि. १५ नोव्हेंबर, रोज शनिवारला बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीच्या औचित्यावर विविध आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य सुधाकर गजभिये यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिक्षक राजेंद्र भोंगाडे, उमेश चौरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. आदिवासींच्या हक्काची जंगलं, जल, जमीन वाचविण्याकरिता, ध्येय आणि अधिकाराप्रती अन्याय विरोधात लढा देणाऱ्या क्रांतिवीर जननेता बिरसा मुंडाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. त्याचप्रमाणे अधिकारासोबतच आपल्या कर्तव्याप्रति एकनिष्ठ राहावे. असे विचार प्राचार्य सुधाकर गजभिये यांनी यावेळी व्यक्त केले. सहाय्यक शिक्षिका भारती कुमरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमास प्रा देवेंद्र धुंदे, प्रा पंकज बावनकर, प्रा वर्ष सेलोकर, सहा.शि.प्रफुलकुमार वडे, पल्लवी धुवाधपार, मृत्युंजय सिंग, आनंद मेनकुदळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाच्या विद्यार्थिनी सेजल मिश्रा तर आभार प्रदर्शन कोमल रोकडे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




