spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बनावट लिंक पाठवून वाहनचालकांची फसवणूक, सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

अमरावती :- अलीकडील काळात चालक परवाना, वाहन नोंदणी, ई-चलन आदी सेवांशी संबंधित बनावट संकेतस्थळे, फसवे मोबाईल ॲप, ‘एपीके’ तसेच एसएमएस, व्हॉट्स ॲपद्वारे पाठविल्या जाणाऱ्या बनावट लिंकच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या लक्षात आले आहे.

या प्रकारांमुळे वाहन चालक व मालकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बनावट संकेतस्थळे व ॲप्स पासून सावधान राहण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाशी संबंधित सेवांसाठी नागरिकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

बाजारात खासगी कंपन्यांकडूनही वैयक्तिक ॲप, संकेतस्थळ, माहितीचे दुवे सुरू आहेत. मात्र यातील अनेक कंपन्यांकडून वाहनचालकांना व्हॉट्सॲप, एसएमएसद्वारे ऑनलाईन लिंक, ‘एपीके’फाईल्स पाठवून वाहनावरील दंड, किंवा परवाना नुतनीकरण करण्यासाठी बनावट संदेश पाठवले जात आहेत.

अमूक दिवसात अमूक तासात दंड भरावा, अन्यथा कारवाई होईल, असा इशारा देऊन वाहनचालकांना, नागरिकांना अशा लिंकवर जाण्यास प्रवृत्त केले जात आहे. यासंदर्भात परिवहन विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विविध सेवांसाठी परिवहन विभागाने अधिकृत संकेतस्थळ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

वाहन नोंदणी, चालक परवाना, परिवहन सेवांसाठी तसेच ई-चलनासाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. ही सर्व संकेतस्थळे “जीओव्ही.इन” या डोमेनने समाप्त होतात. “.कॉम”, “.ऑनलाईन”, “.साईट”, “.इन” अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाईटवर नागरिकांनी व्यवहार करू नयेत. फसवणूक करणाऱ्यांकडून बहुधा “आपल्या वाहनावर चलन बाकी असून त्वरित दंड भरा” किंवा “डीएल सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” अशा धमकीवजा संदेशांसह अनधिकृत लिंक्स पाठविल्या जातात.

परिवहन विभाग किंवा आरटीओ कडून कधीही व्हॉट्सॲप द्वारे ‘पेमेंट लिंक’ पाठविली जात नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच “आरटीओ सर्व्हिस.एपीके”, “एमपरिवहन-अपडेट.एपीके”, “ईचलन-पे.एपीके” यांसारखी अनधिकृत ॲप्स डाउनलोड करू नयेत. अशा ॲपद्वारे ओटीपी, बँकिंग तपशील व मोबाईलमधील संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते.

कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नागरिकांनी तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर फसवणूक हेल्पलाइन १९३० तसेच जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

Popular Articles