– ५० लाख देऊन आमदाराची फार्म हाऊसवरून सुटका? चंद्रपूरच्या राजकारणात भूकंपाचे धक्के
– “माझ्यावर २० नाही, ३३ गुन्हे आहेत,” सरकार यांचे उघड आव्हान; भाजपमधील अंतर्गत कलहाचा भडका
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असतानाच भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा उद्रेक झाला आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक अजय सरकार यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत थेट स्थानिक आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या मुलावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “आमदारांचा मुलगा ड्रग्सच्या आहारी गेला असून, पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी १० लाख आणि ५० लाखांच्या ‘सेटिंग’ केल्या गेल्या,” असा दावा सरकार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अजय सरकार यांनी आमदारांच्या मुलावर अत्यंत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आमदारांचा मुलगा ड्रग्स घेतो, हे संपूर्ण शहराला माहीत आहे. एका प्रकरणात त्याला पोलिसांनी पकडले होते, तेव्हा १० लाख रुपये देऊन ते प्रकरण दाबण्यात आले. तसेच, एका फार्म हाऊसवर झालेल्या कारवाईतआमदाराने ५० लाख रुपये देऊन स्वतःला सोडवले हे सर्वच ठाऊक असल्याचा ठपका सरकार नी ठेवला. आमदारांनी आधी आपल्या मुलाचे कारनामे पाहावेत आणि मगच दुसऱ्यांवर बोट उचलावे.”
तिकीट वाटपावरून नाराज असलेल्या सरकार यांनी आमदारांच्या दुटप्पी भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. “आज मला गुन्हेगार म्हणणाऱ्या आमदारांना २०१४ मध्ये माझी आठवण आली नाही का? तेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी प्रचार केला. डॅमवर पार्ट्या करण्यासाठी त्यांना अजय सरकार हवा असायचा, आता तिकीट मागितल्यावर मी गुन्हेगार झालो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “माझ्यावर २० गुन्हे आहेत असे आमदार म्हणतात, त्यांना खोटे बोलायची सवय जडली आहे. माझ्यावर २० नाही, तर ३३ गुन्हे आहेत, हे मी छातीठोकपणे सांगतो. कायद्याच्या चौकटीत बसत नसतो, तर माझा फॉर्मच बाद झाला असता,” असे खुले आव्हान सरकार यांनी दिले.
बंगाली कॅम्पचे ‘रात्रीचे’ किस्से बाहेर काढू”
अजय सरकार यांनी आक्रमक पवित्रा घेत आमदारांच्या मुलाच्या खासगी आयुष्यावरही प्रहार केला. “आमदाराचा मुलगा रात्री बंगाली कॅम्पमधून कोणत्या मुलीला गाडीत बसवून नेतो, याचे फुटेज आणि माहिती आमच्याकडे आहे. त्यांचे सर्व ‘प्रताप’ (पोतीपुराण) आम्हाला ठाऊक आहेत. त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत,” असा इशारा त्यांनी दिला.
गुन्हे लपवत नाही, छातीठोकपणे सांगतो!”
साधारणपणे उमेदवार आपले गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अजय सरकार यांनी, “माझ्यावर २० नाही, ३३ गुन्हे आहेत,” असे सांगत एक वेगळाच पायंडा पाडला आहे. “कायद्याने मला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,” असेही ते म्हणाले.: “माझ्यावर गुन्हे आहेत, पण मी पळपुटा नाही. कायद्याच्या चौकटीत बसलो नसतो, तर माझा उमेदवारी अर्ज कधीच रिजेक्ट झाला असता. निवडणूक आयोगाने मला पात्र ठरवले आहे, मग गुन्हेगार ठरवणारे आमदार कोण? ही निवडणूक आता प्रतिष्ठेची नाही, तर अस्तित्वाची आहे,” असे अजय सरकार यांनी ठणकावून सांगितले.








