– महत्त्वाचे दस्तऐवज आणि रजिस्टर जप्त; २०२० च्या बोगस रॉयल्टी प्रकरणाचा तपास तीव्र
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केल्याने रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या आणि रेती तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेत, ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लोभी गावात धाड टाकली. या कारवाईत प्रमुख रेती व्यावसायिक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून, त्यांच्या दोन पोकलेन मशिन सील करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई २०२० मधील बहुचर्चित ‘बोगस रॉयल्टी’ (रेती परवाना) प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी करण्यात आल्याचे समजते.
अंमलबजावणी संचालनालयाने केवळ तुमसरमध्येच नाही, तर नागपूर आणि सावनेरसह विदर्भातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी शोधमोहीम राबवली. लोभी येथील कारवाई दरम्यान कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. रेती व्यावसायिक यांच्या डोंगरी बुजुर्ग येथील दुकानाचीही झडती घेण्यात आली असून, तिथून काही महत्त्वाचे रजिस्टर आणि संशयास्पद कागदपत्रे तपास पथकाच्या हाती लागली आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत यंत्रणेने अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.
छापेमारी दरम्यान तपास पथकाने केवळ कागदपत्रांचीच नव्हे, तर गहाणे यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचेही बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्याकडील महागड्या आलिशान गाड्या आणि इतर वाहनांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याचा संशय असल्याने सर्व बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे.
तुमसर तालुक्यात अलीकडेच ४२ रेती घाटांचा लिलाव झाला असून, त्यात अनेक मोठे माफिया सक्रिय आहेत. मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या रेती घाटांवर अजय गहाणे यांचे वर्चस्व मानले जाते. येथील उच्च दर्जाच्या रेतीला नागपूर आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी असते. गहाणे यांच्यावर झालेल्या या अचानक कारवाईमुळे तालुक्यातील राजकीय आणि व्यापारी वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. काही स्थानिक जाणकारांच्या मते, राजकीय प्रभावाचा वापर करून ही कारवाई करण्यात आली आहे का, असाही संशय व्यक्त केला जात आहे.
तुमसर तालुक्यात ‘ईडी’च्या या पहिल्या मोठ्या कारवाईमुळे महसूल आणि पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे. २०२० च्या बोगस रॉयल्टी घोटाळ्यात गहाणे यांची नेमकी भूमिका काय होती आणि या रॅकेटमध्ये इतर कोणकोणते बडे मासे अडकले आहेत, याचा तपास आता केंद्रीय यंत्रणा करत आहे. येत्या काळात या प्रकरणाची झळ जिल्ह्यातील काही बड्या आणि प्रभावशाली व्यक्तींपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.








